गांधींसाठी गांधी मैदानात, संभाजी भिडे यांच्याविरोधात ‘ते’ तीन गुन्हे दाखल करा; तुषार गांधी यांची मागणी
तक्रार करणाऱ्यांमध्ये महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधीही आहेत. तुषार गांधी यांच्या घराण्यातील स्त्रियांचा अपमान भिडेंनी केला आहे. गांधी घराण्यातील स्त्रियांची बेअब्रू आणि सगळ्या पिढ्यांची बेअब्रू केली आहे.
पुणे | 10 ऑगस्ट 2023 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करणं शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे ऊर्फ मनोहर कुलकर्णी यांना चांगलच भोवणार असल्याचं दिसत आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात थेट महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी पोलिसात तक्रार केली आहे. संभाजी भिडे यांचं विधान आक्षेपार्ह असून त्यांना अटक करण्यात यावी. त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात यावी, अशी मागणी तुषार गांधी यांनी केली आहे. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. गांधी यांच्या या तक्रारीमुळे संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तुषार गांधी, विश्वंभर चौधरी, कुमार सप्तर्षी, मेधा पुरव सामंत, अन्वर राजन, संकेत मुनोत, युवराज शहा यांनी संभाजी भिडे आणि त्यांचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यावर तक्रार दाखल केली आहे. संभाजी भिडे आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
एखाद्या ठिकाणी भाषण करायचं आणि त्याची चित्रफीत करून समाज माध्यमांवर टाकायची, असा प्रकार या लोकांनी केला आहे. करोडो लोकांनी ही चित्रफित बघितली आहे. ऐकली आहे. त्यामुळे संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा, अशा स्वरूपाची तक्रार डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
आमच्या न्यायसंस्थेवर विश्वास
संभाजी भिडे आणि त्याच्या कार्यक्रमाबाबत आम्ही तक्रार नोंदवली आहे. बापू हे पब्लिक फिगर आहेत. त्यांच्यावर टीका, टिप्पणी होते. पण या माणसाने पुढे जाऊन बापूंच्या आई आणि वडिलांवर टीका केली आहे. हे अत्यंत चुकीचं आणि वेदनादायी आहे. त्यामुळे भिडे यांच्यावर कारवाई केली पाहिजे. त्यांना अटक केली पाहिजे. भिडे यांच्यावर कारवाई होईल याचा विश्वास आहे. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, असं तुषार गांधी म्हणाले.
आमच्या महिलांचा अपमान
अशा प्रकारची विधाने करण्याची संभाजी भिडे यांची हिंमत नाही. त्यांचा बोलविता धनी आरएसएस आहे. देवेंद्र फडणवीस हे सभागृहात एक आणि बाहेर वेगळं बोलत असतात. संभाजी भिंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी आम्ही तक्रारीत केली आहे. भिंडे यांनी आमच्या कुटुंबातील महिलांचा अपमान केला आहे, असा दावा तुषार गांधी यांनी केला आहे.
तीन गुन्हे कोणते?
यावेळी वकील असीम सरोदे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तक्रार करणाऱ्यांमध्ये महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधीही आहेत. तुषार गांधी यांच्या घराण्यातील स्त्रियांचा अपमान भिडेंनी केला आहे. गांधी घराण्यातील स्त्रियांची बेअब्रू आणि सगळ्या पिढ्यांची बेअब्रू केली आहे.
त्यामुळे कलम 499 अब्रू नुकसानी करणे, अपमान करणे, स्त्रीत्वाचा अपमान करणे, कलम 153 अ नुसार समाजामध्ये शत्रुत्व पसरवणे, महात्मा गांधी, लोकशाही आणि संविधान मानणाऱ्या लोकांच्या संदर्भात द्वेष भाव निर्माण करणे, तसेच 505 नुसार गुन्हेगारी स्वरूपाचा खोडसाळपणा करणे आदी गुन्हे संभाजी भिडे आणि आयोजकांवर दाखल करण्याची मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे, अशी माहिती सरोदे यांनी दिली. चौकशी करून, आम्ही गुन्हा नोंद करू, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.