पिंपरी चिंचवड : दिघी (Dighi) परिसरात पुन्हा 12 डुक्कर बॉम्ब (Pig bombs) सापडले आहेत. या पूर्वी याच परिसरात डुक्कर बॉम्ब खेळताना 5 वर्षीय मुलीचा मृत्यू (Dead) झाला होता. त्याचवेळी या परिसरात 30 डुक्कर बॉम्ब आढळून आले होते. त्यावेळी दोन आरोपींना दिघी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दोन महिन्यापूर्वीची घटना वडमुखवाडी, चऱ्होली या परिसरात घडली होती. त्यावेळी डुक्कर बॉम्ब आढळून आले होते. पोलिसांना याची कल्पना देण्यात आल्यानंतर त्याचा अधिक तपास करण्यात आला होता. आतादेखील त्याच परिसरात शुक्रवारी डुक्कर बॉम्ब आढळले आहेत. डुक्कर मारण्यासाठी या बॉम्बचा उपयोग होतो. दरम्यान, हा फेब्रुवारी महिन्यातील बॉम्ब असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
साधारणपणे सुपारीएवढ्या आकाराचे हे बॉम्ब असतात. त्याला दोरा गुंडाळलेला असतो. हीच वस्तू फोडत असताना चऱ्होली परिसरातील अलंकापुरम सोसायटीजवळच्या गाईच्या गोठ्याजवळ या डुक्कर बॉम्बचा स्फोट झाला होता. त्यात आरती गवळी (वय 4) या मुलीचा मृत्यू झाला होता. तर इतर दोन मुले गंभीर जखमी झाली होती.
आताही याच परिसरात डुक्कर बॉम्ब सापडले असून याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी शोध घेतला असता जवळपास 12 बॉम्ब सापडले आहेत. हे बॉम्ब त्याचवेळी ठेवण्यात आले असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. अधिक तपास सुरू आहे.