खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीच्या बोगस दाखल्याची सुनावणी सुरू असतानाच मोठी घडामोड; काय होणार पुढे?
भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातीच्या बोगस दाखल्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे खासदार शिवाचार्य यांचे हे प्रकरण लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवायाचार्य हे भाजपचे सोलापूरचे खासदार आहेत.
सोलापूर | 1 सप्टेंबर 2023 : सोलापूरचे भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीच्या बोगस दाखल्याची सुनावणी गेल्या चार वर्षापासून सुरू आहे. आता तर त्यांच्या खासदारकीची टर्मही संपत आली आहे. तरीही त्यावर अद्याप निकाल आलेला नाही. लोकसभा निवडणुकीला अवघे 8-9 महिने बाकी असतानाच आता मोठी घडामोड घडली आहे. त्यामुळे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना दिलासा मिळणार की नाही? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या घडामोडींवर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी मात्र अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीच्या बोगस दाखल्याची सुनावणी सुरु असलेल्या जातपडताळणी समितीच्या अध्यक्षांची मुंबईत बदली झाली आहे. जात पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सूळ यांनी यापूर्वी सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांचा जातीचा दाखला बोगस असल्याचा निकाल दिला होता. मात्र या प्रकरणाची फेरचौकशी करण्याचे आदेश मुबंई हायकोर्टाने दिल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा सोलापूर जात पडताळणी समितीकडे आले होते. मात्र आता सुनावणी पूर्ण होण्यापूर्वीच जातपडताळणी समितीच्या अध्यक्षांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे शिवाचार्य यांच्या जातीच्या दाखल्याची पडताळणी आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सामान्य प्रशासन विभागात बदली
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव सूळ यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्याने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने त्यांच्या बदलीचे हे स्वतंत्र आदेश काढले आहेत. त्याचबरोबर त्यांना सामान्य प्रशासन विभागात तत्काळ रुजू होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसं आदेशाच्या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे सुळ यांना सामान्य प्रशासन विभागात पदभार स्वीकारावा लागणार आहे. सुळ यांची बदली झाल्याने आता नव्या अधिकाऱ्याच्या हाती हे प्रकरण जाणार आहे.
निकाल विरुद्ध गेला
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात सोलापूर जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव सूळ यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. तक्रारदारांच्या आक्षेपानुसार त्यांनी महास्वामींच्या मूळगावापर्यंत दक्षता पथकाला पाठवून कागदपत्रांची पडताळणी केली होती. त्यात महास्वामींचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचं सिद्ध झालं होतं. सुळ यांनी तसा निकालही दिला होता. त्यामुळे सिद्धेश्वर महास्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे या प्रकरणाची फेरचौकशी सुरू झाली होती.
नव्या अध्यक्षांकडे प्रकरण
दरम्यान, सुळ यांच्या जागी जात पडळताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून बी. जी. पवार यांच्याकडे प्रभार देण्यात आला आहे. बी. जी. पवार हे आज किंवा उद्या प्रभार स्वीकारतील. त्यानंतर ते या प्रकरणाला हात घालतील असं सांगितलं जात आहे. मात्र, पवार या प्रकरणावर कधी निर्णय देणार हे अद्याप गुलदस्त्यात असल्याने आता हे प्रकरण लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.