पुण्यातील बोगद्यात 300 फूट खाली पडले शेतकरी, बोगद्यातील पाणी शेतीसाठी घेण्यासाठी गेले अन्…
Pune News : पुणे नीरा आणि भीमा या नद्यांना जोडण्याचे काम सुरु आहे. या नद्यांसाठी बनवलेल्या बोगद्यात शेतकरी उतरले. त्यांचे संतुलन बिघडले. त्यानंतर 300 फूट खाली पडले. स्थानिक प्रशासनकडून रात्रभर रेस्क्यू अभियान राबवून त्या शेतकऱ्यांचा शोध घेतला. दुर्देवाने या घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
योगेश बोरसे, पुणे, दि. 23 नोव्हेंबर | पुणे जिल्ह्यातील दोन महत्वाच्या नद्या नीरा आणि भीमा या जोडण्याचे काम सुरु आहे. या नद्या जोडण्यासाठी बोगदा बनवण्यात येत आहे. आतापर्यंत 300 फूट हा बोगदा तयार झाला आहे. या बोगद्यातून पाणी आपल्या शेतीपर्यंत आणण्यासाठी दोन शेतकरी बोगद्यात उतरले. परंतु बोगद्यात उतरताच त्यांचे संतुलन बिघडले आणि ते 300 फूट खाली कोसळले. या दोन शेतकऱ्यांच्या शोध घेण्यासाठी रात्रभर रेस्क्यू अभियान राबवण्यात आले. त्यानंतर त्यांचा तपास लागला. दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. उत्तराखंडमधील उत्तरकाशी बोगद्यात 11 दिवसांपासून 41 मजूर अडकले आहे. त्यांना सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असताना पुणे जिल्ह्यात हा प्रकार घडला.
विद्युत पंप बसवणे बेतले जीवावर
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काझड येथे निरा- भिमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात इंदापूर तालुक्यातील दोन शेतकरी कोसळल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. अनिल बापूराव नरूटे आणि रतिलाल बलभीम नरोटे हे दोन्ही शेतकरी बोगद्यातील पाणी शेतीसाठी देण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी बोगद्यात विद्युत पंप त्यांना बसवायचा होता. दोन्ही जण बोगद्यात उतरले तेव्हा त्यांचे संतुलन बिघडले आणि ते बोगद्यात पडले. या प्रकाराची माहिती स्थानिक लोकांना मिळाली. त्यानंतर त्यांनी ठेकेदाराशी आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क केला.
क्रेन मागवून सुरु केला शोध
शेतकरी पडल्याची माहिती मिळाल्यावर ठेकेदाराने मोठी क्रेन मागवली आणि शोध सुरु केला. या दोघांचा ही रात्री उशीरापर्यंत शोध सुरु होता.अखेर रात्री साडेअकरा पावणेबाराच्या सुमारास या दोघांचेही मृतदेह शोधण्यात स्थानिक नागरिकांसह प्रशासनाला यश आले आहे. अनिल बापूराव नरूटे आणि रतिलाल बलभीम नरोटे अशी या दोन शेतकऱ्यांची नावे असून ते इंदापूर तालुक्यातील काझड येथील सिध्देश्वर वस्ती येथील रहिवासी आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. दरम्यान या घटनेमुळे काझड गावावर शोककळा पसरली आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांनी बोगद्यात जाऊ नये, असे आवाहन केले आहे.