प्रकाश आंबेडकर यांना मविआत घ्यावं का?; अजित पवार यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; आघाडीचे नेते आता काय निर्णय घेणार?
2017 ला पिंपरीत माझा पराभव झाला याची खंत आजही आहे. माझेच सहकारी तिकडे गेले म्हणून हे सगळं घडलं होतं. हिंजवडीतल्या आयटी वोटरनं मोदी प्रेमात भाजपला निवडून दिलं.
पुणे: प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीची उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती झाली आहे. मात्र, वंचितला अजूनही महाविकास आघाडीत घेण्यात आलेलं नाही. प्रकाश आंबेडकर यांनीही आमची युती फक्त शिवसेनेसोबतच झाल्याचं म्हटलं आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वंचितला आघाडीत घेण्याचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही तसंच म्हटलं आहे. परंतु, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वंचितला महाविकास आघाडीत घ्यावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे वंचित महाविकास आघाडीत जाणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती झाली आहे. महविकास आघाडी टिकावी आणि आघाडीची गोळाबेरीज वाढण्यासाठी ज्यांना वाटतं त्यांनी यावं. आघाडीत येण्याचा अनेक जणांनी प्रयत्न करावा. वंचित बहुजन आघाडीला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे एकत्र लढले तर महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण होईल, असं अजित पवार म्हणाले.
माझी वैयक्तिक इच्छा
महाविकास आघाडीत वंचित यावी ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. वरिष्ठ नेते आणि पक्ष काय तो निर्णय घेईल. महविकास आघाडीत एकत्रित बोलत असताना कुणाचा अपमान होणार नाही याची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी, असंही ते म्हणाले.
उमेदवार निवडून आणू
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्ही या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार देणार आहोत. त्यामुळे निवडणूक होणार आहे. निवडणूक बिनविरोध होण्याचा प्रश्नच नाही, असं त्यांनी सांगितलं.
आयटी वोटरमुळे…
2017 ला पिंपरीत माझा पराभव झाला याची खंत आजही आहे. माझेच सहकारी तिकडे गेले म्हणून हे सगळं घडलं होतं. हिंजवडीतल्या आयटी वोटरनं मोदी प्रेमात भाजपला निवडून दिलं. त्या लोकांनी कमळ निवडून आणलं म्हणून पीसीएमसीत राष्ट्रवादीचा पराभव झाला होता, असं त्यांनी सांगितलं.
तर महापौर राष्ट्रवादीचाच असता
त्यावेळी भाजपने प्रभाग फोडले होते. मी पण यावेळी तसंच केलं होतं. पण सत्ताबदल झाला आणि निवडणूक लांबली. नाहीतर यावेळी पिंपरीत राष्ट्रवादीचाच महापौर दिसला असता, असा दावा करतानाच प्रभाग रचनेत फेरफार केल्याची अप्रत्यक्ष कबुलीच पवार यांनी दिली.