Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे कमी करण्याची तयारी, काय आहे कारण
Vande Bharat Express : महाराष्ट्रातून चार वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. सर्वच वंदे भारत एक्स्प्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यावेळी रेल्वे प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. सरकार वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे कमी करणार आहे...
पुणे : भारतीय रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्रातून चार मार्गावरुन धावत आहे. देशभरातही अनेक मार्गावरुन ही गाडी धावत आहे. या गाडीची लोकप्रियता वाढत आहे. आता ७ जुलै रोजी आणखी दोन मार्गावरुन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. राज्यात मुंबई- गांधीनगर दरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर, मुंबईवरुन शिर्डी अन् आता मागील आठवड्यात मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली. परंतु आता रेल्वे मंत्रालय वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर कमी करण्याचे विचार करत आहे.
का होणार दर कमी
रेल्वे कमी लांबीच्या ट्रेनचे भाडे कमी करण्याचा विचार करत आहे. कारण कमी अंतराच्या रेल्वेतील सर्व आसनांचे बुकींग होत नाही. इंदूर-भोपाळ, भोपाळ-जबलपूर आणि नागपूर-बिलासपूर या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसचे दर कमी होणार आहे. कारण या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसचे बुकींग पूर्ण होत नाही.
कुठे किती कमी प्रतिसाद
जून महिन्यात भोपाळ-इंदूर मार्गावरील २९ टक्केच सीटचे बुकींग झाले. इंदूर भोपाळ मार्गावर २१ टक्केच सीटचे आरक्षण झाले. तीन तासांच्या प्रवासासाठी या ट्रेनचे एसी चेअर कारचे भाडे ९५० रुपये आहेत तर एक्झीकेटीव्ह चेअर कारचे भाडे १५२५ रुपये आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत आहे.
मुंबई गोवाची काय परिस्थिती
27 जून 2023 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि गोवामधील मडगाव स्टेशन दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली. या ट्रेनचे एसी चेअर कारचे भाडे 1435 रुपये तर एक्झीकेटीव्ह क्लासचे भाडे 2495 रुपये आहे. या मार्गावर विमानाचे भाडेही दोन ते अडीच हजार दरम्यान आहे. परंतु निसर्ग सौदर्यंचा आनंद वंदे भारत एक्स्प्रेसने मिळत आहे. यामुळे या मार्गावर तिकीट बुकींग फुल्ल होत आहे.
मुंबई गोवा 586 किमी अंतरासाठी रेल्वे प्रवास 11ते 12 तासांचा आहे. परंतु वंदे भारत एक्स्प्रेसने हा प्रवास 8 तासांत होतो. तसेच विमानाने गेल्यास चेक आऊट, चेक इन प्रोसेसला आणि विमानतळावर जाण्यास वेळ लागतो.