वंदे भारत एक्स्प्रेस हिट, पुणे, मुंबईकरांनी दिला जोरदार प्रतिसाद
गेल्या 6 दिवसांत 3 हजार 273 पुणेकरांनी 'वंदे भारत ट्रेन'ने प्रवास केला आहे. 'वंदे भारत एक्स्प्रेस'ने प्रवास करताना 'पुणे ते सोलापूर'च्या तुलनेत पुणे ते मुंबई या प्रवासाला प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
पुणे : भारतीय रेल्वेचा विस्तार वेगाने होत आहे. रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस अनेक मार्गावरुन जात आहे. आता पुणेकरांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली आहे. 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई-पुणे-सोलापूर (Mumbai-Pune-Solapur Route) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express)ला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर या रेल्वेला मुंबई आणि पुणेकरांनी (Punekars) भरभरुन प्रतिसाद दिला आहे. सोलापूरकरांपेक्षा पुणे आणि मुंबईतील प्रवाशी याचा जास्त फायदा घेत आहे.
पुणेकरांनी दिली पसंती
गेल्या 6 दिवसांत 3 हजार 273 पुणेकरांनी ‘वंदे भारत ट्रेन’ने प्रवास केला आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने प्रवास करताना ‘पुणे ते सोलापूर’च्या तुलनेत पुणे ते मुंबई या प्रवासाला प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन ‘वंदे भारत ट्रेन’चे उद्घाटन करण्यात आले. मुंबई ते सोलापूर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सोलापूरमार्गे पुण्यापर्यंत धावते. पुण्यातून धावणारी ही पहिली ‘वंदे भारत’ ट्रेन असल्याने पुण्यातील लोकांमध्ये ‘वंदे भारत एक्स्प्रेस’बद्दल कमालीची उत्सुकता होती. ही ट्रेन आता पुणेकरांच्या पसंतीस उतरली आहे.
33 हजार 273 प्रवाशांचा प्रवास
मुंबई-सोलापूर वंदे भारत मार्गे पुण्यातून 6 दिवसांत 33 हजार 273 प्रवाशांनी प्रवास केला आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ जलद आणि आरामात प्रवास करू शकत असल्याने याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणेकरांना सकाळी मुंबईला जाण्यासाठी ‘वंदे भारत’ ही सोयीचे असल्याने नागरिकांनी पुणे ते सोलापूरच्या तुलनेत पुणे ते मुंबई प्रवास करण्यास प्राधान्य दिले आहे.
11 ते 17 फेब्रुवारी दरम्यान 2 हजार 539 प्रवाशांनी पुणे ते मुंबई असा प्रवास केला. पुणे ते सोलापूर असा प्रवास केवळ 734 प्रवाशांनी केल्याचे दिसून आले. पुढील काही दिवसांच्या बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
आठवड्यातून सहा दिवस ट्रेन
वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरहून सकाळी 6.50 वाजता सुटेल. पुण्यात सकाळी 9 वाजता पोहचणार आहे. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता मुंबईला पोहचेल. त्याच दिवशी दुपारी 4.10 वाजता ती मुंबईहून निघेल. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुण्याला पोहचेल. रात्री 10.40 वाजता सोलापूरला पोहचणार आहे. ही सेवा आठवड्यातून सहा दिवस उपलब्ध असेल. ही एक्स्प्रेस बुधवारी मुंबईतून आणि गुरुवारी सोलापूरहून धावणार नाही. देशभरात ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन मानली जात असून तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे.