वंदे भारत एक्स्प्रेस उभी राहणार स्वत:च्या पायावर, रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय
रेल्वेची चाके निर्मिती प्लांटसाठी तीन कंपन्यांनी बोली लावली होती. यामध्ये रामकृष्ण फोर्जिंग्ज, भारतीय स्टील अथॉरिटी (सेल) आणि भारत फोर्ज यांचा समावेश आहे.
पुणे : देशातील रेल्वेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मोदी सरकारने अनेक प्रयोग सुरु केले आहेत. आतापर्यंत दहा वंदे भारत एक्स्प्रेस ( Vande Bharat Express) गाड्या सुरू करण्यात आल्या आहे. येत्या काही दिवसांत त्यात मोठ्या संख्येने भर पडणार आहे. मात्र या गाड्यांना लागणारी बहुतांश चाके अजूनही परदेशातून आयात केली जात आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे ही चाके चीनकडून आणली जात आहेत. मात्र लवकरच ही परिस्थिती बदलणार आहे. आता ही चाकेही भारतात तयार केली जाणार आहे. रेल्वेने त्यासाठी निविदा काढल्या आहेत.
देशातील ट्रेनमध्ये वापरण्यात येणारी फोर्ज्ड व्हील्सची (forged wheels)चाके आता फक्त भारतातच बनवली जातील. भारतीय रेल्वेने यासाठी निविदा काढल्या होत्या. त्यानुसार दरवर्षी 80 हजार चाके देशातच तयार होतील. मेक इन इंडिया उपक्रमासाठी तो महत्त्वाचा मानला जातो. यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस स्वत:च्या पायावर उभी राहणार आहे.
कोणत्या आहेत कंपन्या
या प्लांटसाठी तीन कंपन्यांनी बोली लावली होती. यामध्ये रामकृष्ण फोर्जिंग्ज या कोलकातास्थित कंपनीशिवाय भारतीय स्टील अथॉरिटी (सेल) आणि भारत फोर्ज यांचा समावेश आहे. या निविदांमध्ये रामकृष्ण फोर्जिंगला (Ramakrishna Forgings) L1 म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या कंपनीने 1,88,100 रुपये प्रति टन बोली लावली होती. भारत फोर्जची (Bharat Forge) बोली 2,75,000 रुपये आणि सेलची (SAIL)बोली 2,89,500 रुपये होती. निविदा मिळणाऱ्या कंपनीस 36 महिन्यांच्या आत वार्षिक 80,000 चाकांचा पुरवठा करणे आवश्यक आहे.
सध्या, सेल 1,87,000 रुपये प्रति टन दराने चाकांचा पुरवठा करत आहे. सध्या, सेलची वार्षिक क्षमता 40,000 चाकांची आहे. RINL ची क्षमता 80,000 चाकांची आहे. परंतु कंपनीने अद्याप नियमित व्यावसायिक उत्पादन सुरू केलेले नाही. रेल्वे 1960 पासून लोकोमोटिव्ह आणि कोचिंग स्टॉकसाठी चाके आयात करत आहे.
कोठून येतात चाके
यूके, झेक प्रजासत्ताक, ब्राझील, रोमानिया, जपान, चीन, युक्रेन आणि रशिया या देशांतून आले आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात सुमारे 80,000 चाके आयात करण्यात आली. हे रशिया आणि चीनमधून आयात केले गेले आणि त्यावर सुमारे 520 कोटी रुपये खर्च झाले. तसेच सेलकडून 40,000 चाकांचा पुरवठा करण्यात आला.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे ही चाके चीनमधूनच आयात केली जात आहेत. 2026 पर्यंत देशात या चाकांची मागणी दोन लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. याचे कारण म्हणजे देशात अधिकाधिक हायस्पीड गाड्या चालवल्या जात आहेत.
वंदे भारत एक्स्प्रेस चालवणारी पहिली महिला आहे तरी कोण, मुंबई-पुणे मार्गावर चालवली एक्स्प्रेस