कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी पुण्याची तयारी, ऑक्सिजनपासून जम्बो कोविड सेंटरपर्यंत नियोजन सुरू
पुण्यात तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) पायाभूत सुविधा उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. याचा आढावा महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी घेतला. त्यांनी रुग्णालये, ऑक्सिजन प्लांट यांची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
पुणे : कोरोना (Corona) प्रादुर्भावाची दुसरी लाट ओसरत असतानाच केंद्र सरकारकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व आरोग्य यंत्रणा त्यादृष्टीने सज्ज होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पुण्यात तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) पायाभूत सुविधा उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. याचा आढावा महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी घेतला. महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालय आणि अण्णासाहेब मगर रुग्णालयातल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालये, ऑक्सिजन प्लांट यांची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. (Various measures are being taken in Pune for the third wave of corona)
दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रयत्न
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्यात अक्षरशः हाहाकार पहायला मिळाला होता. यादरम्यान एक वेळ अशी होती की, देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या ही पुण्यात होती. एका दिवसात सात हजारांच्या आसपास रुग्णसंख्या वाढत होती. त्यावेळ शहरातले सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयातले बेड्स हाऊसफुल्ल होते. त्यामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली होती. त्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवल्याने रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणांची बिकट स्थिती झाली होती. या सगळ्या काळात रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी सगळ्यांची चांगलीत दमछाक झालेली पहायला मिळाली. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिलेला असताना पुण्यात पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये यासाठी आतापासूनच प्रयत्न केले जात आहेत.
एक लाख 80 हजार कोरोनाबाधित आढळण्याची शक्यता
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्यात सुमारे सव्वा लाख सक्रिय कोरोनाबाधित होते. तिसऱ्या लाटेत या संख्येच्या दीडपट म्हणजे साधारणपणे एक लाख 80 हजार कोरोनाबाधित आढळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या रुग्णांसाठी ऑक्सिजन, खाटा, सिलेंडर यांची उपलब्धता करून देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासाठी पालकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. यासोबतच तिसऱ्या लाटेची आवश्यकता पाहून ऑक्सिजन प्लांटची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच ज्या भागात रुग्णसंख्या जास्त आहे त्या भागात चाचण्यांची संख्या वाढवण्यास सांगण्यात आलं आहे.
… तर सीओईपी जम्बो कोविड सेंटर सुरू करणार
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पुण्यात तिसऱ्या लाटेत रुग्णदर कमी ठेवण्याचा प्रयत्न आहे. पण तरीही रुग्णांची संख्या वाढलीच तर सीओईपी इथे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचा विचार केला जाईल असं अतिरित्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितलं आहे.
ऑक्सिजन उत्पादन आणि साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एका दिवसात ऑक्सिजनची सर्वाधिक मागणी ही 360 मेट्रीक टन होती. त्यावेळी तब्बल एक लाख रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनवर उपचार घेत होते. ऑक्सिजनची ही मागणी लक्षात घेऊन प्रशासन ऑक्सिजनची उत्पादन आणि साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आवश्यकतेनुसार पुढचे तीन दिवस मागणी एवढा ऑक्सिजनचा साठा शिल्लक राहील यादृष्टीने नियोजन केलं जात आहे. त्यासाठी उद्योगांचीही मदत घेतली जाणार आहे.
इतर बातम्या :