जीवे मारण्याच्या धमकीमागे कुणाचा हात? वसंत मोरेंनी थेट मनसे नेत्याचं नाव घेतलं, पुण्यात खळबळ
वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे वसंत मोरे यांनी या धमकीमागे नेमका कुणाचा हात आहे? याबद्दल सर्वात मोठा दावा केला आहे. त्यांनी धमकीमागे एका मनसे नेत्याचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी त्या मनसे नेत्याचं नावदेखील घेतलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्याचे नेते वसंत मोरे यांना सातत्याने फोनवर जीवे मारण्याची धमकी येत आहे. आपण मनसेचा कार्यकर्ता असल्याचं अज्ञात धमकी देणारा इसम आपली ओळख सांगत आहे. या धमकी देणाऱ्यामागे नेमकं कोण आहे? असा प्रश्न वसंत मोरे यांना विचारला असता त्यांनी पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळे पुण्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. “या संदर्भात मी कायदेशीर कारवाई केली आहे. या सर्व घटनांमागे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हेच आहेत”, असं वसंत मोरे स्पष्ट म्हणाले आहेत.
“उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून हे सर्व प्रकार सुरू झाले. हा धमकीचा फोन मला पंधरा दिवसांपूर्वी आला आहे. पंधरा दिवसांपूर्वी एक व्यक्ती मला दिवसभरात 15 ते 20 वेळा कॉल करत होती आणि फोन केल्यानंतर तो काहीच बोलत नव्हता, थेट शिवीगाळ सुरू करायचा. शेवटी मी त्या व्यक्तीचा नंबर ब्लॅक लिस्ट केला, तरी तो व्यक्ती नंबर बदलून वारंवार फोन करून शिवीगाळ करत होता”, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.
धमकी देणाऱ्याने वसंत मोरेंना कात्रज चौकात बोलावलं
“शेवटी त्या व्यक्तीने माझ्या फोनवर फोन करून मला दम असेल तर कात्रज चौकामध्ये येण्यास सांगितले. मी तात्काळ माझा भाचा प्रतीक कोडीतकर याला यासंदर्भात सांगितलं. त्यानंतर प्रतीक कोडीतकर यांनी त्या शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला फोन केला आणि कात्रज बस स्टॉपवर गेला. मात्र त्या ठिकाणी शिवीगाळ करणारी व्यक्ती नव्हती. कात्रज बस स्टॉप जवळ बोलवलं म्हणजे ती व्यक्ती मला चांगलं ओळखते”, असं वसंत मोरे म्हणाले.
‘हा प्लॅन कोण करू शकतं? तर हे मला माहिती’
“शेवटी ती शिवीगाळ करणारी व्यक्ती बोलली, मी मनसेवाला आहे. त्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच नाव घेतलं. मी त्यावेळी म्हणलो, कुणी तरी दारू पिऊन शिवीगाळ करत असेल. मात्र नंतर माझ्या फेसबुक, व्हाट्सअॅपवर ह्याच गोष्टी सुरू झाल्या. जेणेकरून माझ्या हाताने काहीतरी गोष्टी घडाव्यात. माझ्या कार्यकर्त्यांच्या हाताने गोष्टी घडाव्यात. माझ्या लक्षात आलं की हा एक प्लॅन आहे. हा प्लॅन कोण करू शकतं? तर हे मला माहिती आहे”, असं वसंत मोरे म्हणाले.
“आठ तारखेला माझ्या शिवसेना प्रवेशावेळी देखील अशीच घटना घडली. माझ्या मुलाला आणि माझ्या पुतण्याला धनकवडी बालाजी नगर परिसरातील काही कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकून मला कमेंट सुरू केल्या. त्यामध्ये शिवीगाळ सुरू केली. माझा प्रवेश रोखण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचं माझं लक्षात आलं. मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा आवाहन केलं”, असं वसंत मोरे म्हणाले.
मनसेच्या पत्रकार परिषदेवर वसंत मोरेंची प्रतिक्रिया
यावेळी वसंत मोरे यांनी मनसेच्या पत्रकार परिषदेवरही प्रतिक्रिया दिली. “ही पत्रकार परिषद होऊ शकत नाही. ती पत्रकार परिषद फक्त वसंत मोरेला बदनाम करण्यासाठी घेतली होती. ज्यांनी ज्या पाच जणांविरोधात तक्रार केली त्यांची त्यांनी अश्लील कमेंट दाखवावी. एकंदरीत हे सर्व एक प्री प्लान होतं म्हणजे मला कुठेतरी अडकवण्यातसाठी. अश्लील शिवीगाळ करणारा व्यक्ती हा मनसेचा आहे, असा प्रकार करणाऱ्या 40-50 लोकांची नावे माझ्याकडे आहेत”, असं वसंत मोरे म्हणाले.