पुणे : मनसेचे नेते वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मनसेने पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढली पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे वसंत मोरे निवडणूक लढवण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मोरे निवडणूक रिंगणात उतरल्यास पुण्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता वसंत मोरे यांचं एक ट्विट चर्चेत आलं आहे. त्यांची ही पोस्ट सूचक असून या पोस्टमधून त्यांनी प्रस्थापितांना चांगलाच इशारा दिला आहे.
मनसे नेते वसंत मोरे यांनी फेसबुकवर ही पोस्ट केली आहे. निवडणुका होतील ना होतील हा नंतरचा विषय आहे, उमेदवारी मिळेल ना मिळेल हा त्यापेक्षाही नंतरचा विषय आहे, पण पुण्यात वातावरण फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वसंत (तात्या) मोरेच तयार करू शकतो. कारण नाव घेतलं की अख्खं शहर हलतंय… “क्या बोलती पब्लिक”?, असं ट्विट वसंत मोरे यांनी केलं आहे. तसेच मला आणि माझ्या पक्षाला कमी लेखू नका. कारण आम्ही अजूनही स्पर्धेत आहोत, असा सूचक इशाराही वसंत मोरे यांनी आपल्या ट्विटमधून दिला आहे. मोरे यांचा हा रोख भाजप आणि काँग्रेसकडे असल्याचं सांगितलं जात आहे.
दोन दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी पुण्यातील लोकसभा पोटनिडवणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. निवडणूक लागेल की नाही माहीत नाही. पण निवडणूक लागल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्याची विनंती करणार असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत कोणताही मातब्बर नेता उभा राहणार नाही. कारण पुन्हा सहा महिन्यानंतर लोकसभा निवडणुका होणार आहेत. आठ सहा महिन्यासाठी कोणी रिस्क घेणार नाही. निवडणुकीत पैसा ओतणार नाही. अशावेळी मनसेने निवडणूक लढवल्यास मनसेला या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळू शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे.
कोरोना काळात पुण्यात मनसेने प्रचंड काम केलं आहे. त्याची पोचपावती म्हणून मनसेचा खासदार पुणेकर लोकसभेत पाठवतील. तसेच या भागात मनसेचं कामही मोठं आहे. शिवाय मागच्या निवडणुकीत मनसेने तुल्यबळ मते मिळवली आहेत. त्यामुळे आम्ही ही जागा शंभर टक्के काढू शकतो, असा दावाही त्यांनी केला आहे.