VIDEO : पुण्यात मनसेत पुन्हा अंतर्गत धुसफूस, वसंत मोरे विरुद्ध इतर नेते, नेमकं प्रकरण काय?
पक्षातीलच काही नेत्यांकडूनच आपल्याला डावललं जात असल्याचं मनसे नेते वसंत मोरे यांनी म्हटलंय. मात्र असं असलं तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची साथ आपण सोडणार नाही, हे सांगताना तात्यांनी निष्ठेचा पुरावाही दिलाय.
पुणे : पुण्यात पक्षातूनच काही नेत्यांकडून डावललं जात असल्याचं जाहीरपणे मनसे नेते वसंत मोरेंनी सांगितलंय. त्याचबरोबरच मोरेंनी ट्विट केलेल्या व्हिडीओवरुन अधिक चर्चा सुरु झालीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वसंत मोरेंचे फोटो असलेले जुने बॅनर दाखवून, राज ठाकरेंसोबत आपण कसे एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न मोरेंनी केलाय. वसंत मोरेंची अमित ठाकरेंसोबत शुक्रवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीत वसंत मोरेंनी पुण्यातल्या नेत्यांकडूनच कसं बाजूला केलं जातंय? याची माहिती दिली.
त्यानंतर मोरेंनी पोस्टर संदर्भातला व्हिडीओ ट्विट करुन पुण्यातल्या मनसेच्या कोअर कमिटीला उत्तरही दिलं. आणि आता माझी ताकद आजमावण्यापेक्षा पक्षासाठी माझी ताकद वापरा असं इशाराच मोरेंनी मनसेचे नेते बाबू बागस्करांसह मनसेच्या कोअर टीमला दिला…
वसंत मोरेंचा रोख हा बाबू बागस्करांवरच आहे. शुक्रवारी अमित ठाकरेंसोबतच्या झालेल्या बैठकीवरुनही मोरे आणि बागस्कर आमनेसामने आले होते.
माझ्यासंदर्भात अमित ठाकरेंनी बैठक बोलावल्याचं मोरे म्हणाले होते. त्यानंतर मोरे खोटं बोलत असून कोअर कमिटीची बैठक नियोजित होती, त्यानुसार बैठका झाल्याचं बागस्करांनी म्हटलं होतं.
काही दिवसांआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनीही वसंत मोरेंनी राष्ट्रवादीत येण्याची जाहीर ऑफर दिली होती. पण आपण राज ठाकरेंसोबत असल्याचं मोरेंनी स्पष्ट केलंय.
गेल्या काही महिन्यांपासून वसंत मोरे मनसेत नाराज असल्याची चर्चा आहे. मोरे मनसे सोडणार की काय ? अशीही अधूनमधून चर्चा होतच असते. आता ते पुण्यातल्या कोअर कमिटीतल्या नेत्यांवर जाहीरपणे बोलतायत.
पक्षातल्या नेत्यांकडून डावललं जात असल्याचं मोरे सांगत असले तरी राज ठाकरेंसोबतच आपण आहोत हेही ते आपल्या कृतीतून वारंवार दाखवून देत आहेत.