पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुण्यात झाडाझडती करत अनेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. अनेकांकडून कोयतेही जप्त केले आहेत. एवढेच नव्हे तर परवानगीशिवाय कोयते खरेदी करता येणार नसल्याचा नियमही लागू करण्यात आला आहे. मात्र, तरीही कोयता गँगच्या दहशतीतून पुणेकरांची सुटका झालेली नाही. पुणेकरांच्या मनात कोयता गँगची दहशत निर्माण झालेली असतानाच मनसेचे नेते वसंत मोरे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये महिलांच्या हातात कोयते दिसत आहेत. पण या महिला कोयता घेऊन जनावारांसाठी चारा आणायला जात आहेत. मोरे यांनी फोटो ट्विट करतानाच त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. वसंत मोरे यांचं हे ट्विट सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरलं आहे.
आज सकाळी जिम ला चाललो होतो. अचानक समोर तीन महिला भगिनी हातात कोयता घेऊन दिसल्या. मनात आले की इतके आमचे पुणे असुरक्षित झाले का की मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला कोयते घेऊन फिरू लागल्या? मी थोडा त्यांचे मागे गेलो तर त्या जनावरांसाठी चारा गोळा करत होत्या, असं मनसे नेते वसंत मोरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पण असं वाटण्यामागे कारण असं की मागील आठवड्यात आमच्या कात्रज गावठाणमध्ये सकाळी 6 वाजता भर रस्त्यावर एका महिलेचे मंगळसूत्र चोरून चोर रस्त्याने चक्क पळत गेला. जर पोलिसांनी कडक कारवाई नाही केली तर मग असे चित्र दिसले तर नवल वाटून घेऊ नये, असंही मोरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार आणि कोयत्यासह रिल्स बनवणाऱ्या तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिसांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोनजणांना कोयता आणि तलवारीसह अटक करण्यात आली आहे .
आज सकाळी जिम ला चाललो होतो. अचानक समोर ३ महिला भगिनी हातात कोयता घेऊन दिसल्या. मनात आले की इतके आमचे पुणे असुरक्षित झाले का की मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या महिला कोयते घेऊन फिरू लागल्या? मी थोडा त्यांचे मागे गेलो तर त्या जनावरांसाठी चारा गोळा करत होत्या.
(१/२) pic.twitter.com/Hd89F4GQ62— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) February 10, 2023
पुण्यात कोयता गँगची दहशत वाढत असताना शिक्रापूर पोलिसांनी सोशल मीडियातील फेसबुक, इंस्टाग्रामची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. लोकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी सोशल मीडियावर रील्स बनवण्याकरिता तीन मुले हातात कोयता आणि तलवार घेऊन रस्त्यावर फिरत आहेत, अशी खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत दोन मुलांना एक कोयता आणि एक तलवारीसह अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन सराईत गुन्हेगारांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवली होती. या गुंडांच्या हातात चाकू आणि सुरेही होते. या गुंडांनी येथील दुकानांत जाऊन हातातील शस्त्रांचा धाक दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता.
धक्कादायक बाब म्हणजे रस्त्यात जो दिसेल त्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण करत भीती दाखविली जात असल्याने वाहनधारकही भयभीत झाले होते. अखेर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या दोन गुंडांना चांगलाच चोप दिला. हातात कोयते घेऊन पळत असताना पोलिसांनी पाठलाग करून एकाला पकडलं आणि त्याला चांगलाच चोप दिला.