राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन, अयोध्येच्या महाआरतीतही सहभागी होणार; विहिंप, बजरंग दलाच्या मनसेसोबतच्या पुण्यातल्या बैठकीत निर्णय
हिंदुत्ववाद्यांना जवळ करण्याचे सध्या राज ठाकरेंचे प्रयत्न आहेत. यातच विविध हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या या भूमिकेचे समर्थन करत आपला पाठिंबा दिला आहे. आगामी महाआरतीतही या संघटना सहभागी होणार आहेत.
पुणे : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने मनसेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत पुण्यात बैठक घेतली. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मांडलेल्या भूमिकेच्या संदर्भात ही बैठक होती. हनुमान चालिसा, भोंगे, अयोध्या दौरा, महाआरती आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. राज ठाकरे यांच्या अजेंड्याला पाठिंबा देण्यासाठी विविध हिंदू संघटना पुढे येत आहेत. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद (VHP) यांनी 3 मे रोजी होणाऱ्या राज्यव्यापी महाआरतीत सहभागी होण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती मनसेचे नेते अजय शिंदे यांनी दिली आहे. प्रमुख विरोध पक्ष असलेल्या भाजपाने (BJP) तर आधीच राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यानंतर आता विविध हिंदुत्ववादी संघटना राज ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन करताना दिसत आहेत.
अयोध्येतून कार्यकर्ते
1 मेला राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे, तर 3 मेला ते अयोध्येला रवाना होणार आहेत. उद्या सकाळी आठ वाजता राज ठाकरे पुण्यातून औरंगाबादसाठी रवाना होणार आहेत. वाटेत वढू बुद्रुक तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीची पूजा करून औरंगाबादकडे मार्गस्थ होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे यांच्यासोबत पुण्यातून 150 गाड्यांचा ताफा असणार आहे. तर सभेसाठी 12 ते 15 हजार मनसैनिक पुण्यातून जाणार आहेत. विशेष म्हणजे अयोध्या येथूनही कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेला येणार आहेत, असे दावे केले जात आहेत.
3 मेला महाआरती
हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुण्यात झालेल्या महाआरतीत सहभाग घेतला होता. तर त्यांच्या अयोध्या दौऱ्यात ते अयोध्येला महाआरती करणार आहेत. हिंदुत्ववाद्यांना जवळ करण्याचे सध्या राज ठाकरेंचे प्रयत्न आहेत. यातच विविध हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या या भूमिकेचे समर्थन करत आपला पाठिंबा दिला आहे. आगामी महाआरतीतही या संघटना सहभागी होणार आहेत.