अनोखी लढाई! संचालकपदाच्या निवडणुकीत आई-वडिलांसह मुलगा अन् नातीचा विजय; पुण्यातल्या शिवणे ग्रामस्थांनी केला जल्लोष
एकाच कुटुंबातील चार जणांची या निवडणुकीत वर्णी लागल्याने शिवणे ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला. तर विजयी उमेदवारांचे ग्रामस्थांनी साखर वाटून गावाच्या चावडीवर स्वागत केले. रविवारी (दि. 5) ही निवडणूक पार पडली.
मावळ, पुणे : मावळात (Maval) विविध कार्यकारी सोसायटीवर पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच आई, वडील, मुलगा आणि नात यांची वर्णी लागली आहे. पवनमावळात शिवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकपदी जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच घरातील आई-वडील, मुलगा आणि नात असे चारही विजयी झाले आहेत. एकनाथ टिळे, सावित्रीबाई एकनाथ टिळे, धनंजय एकनाथ टिळे आणि नात माधुरी पडवळ अशी पाचही नवनिर्वाचित सदस्यांची (Newly elected members) नावे आहेत. या सोसायटीच्या निवडणुकीसाठी शिवणे, मळवंडी ढोरे, ओझर्डे, सडवली आणि आढे येथील सभासद शेतकऱ्यांनी मतदान केले होते. यात ग्रामविकास शेतकरी सहकार पॅनलच्या माध्यमातून या सदस्यांनी निर्विवाद वर्चस्व या सोसायटीवर (Society) प्रस्थापित केलेले पाहायला मिळाले. शिवणे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर 9 संचालक निवडून आणत ग्रामविकास शेतकरी सहकार पॅनलच्या माध्यमातून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
शिवणे ग्रामस्थांनी केला जल्लोष
एकाच कुटुंबातील चार जणांची या निवडणुकीत वर्णी लागल्याने शिवणे ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला. तर विजयी उमेदवारांचे ग्रामस्थांनी साखर वाटून गावाच्या चावडीवर स्वागत केले. रविवारी (दि. 5) ही निवडणूक पार पडली. शिवणेसह ओझर्डे, मळवंडी ढोरे त्याचबरोबर आढे आणि सडवली अशा विविध ठिकाणच्या सभासद शेतकऱ्यांनी या निवडणुकीसाठी मतदान केले होते. आर. के. निखारे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सोसायटीच्या एकूण 13 जागांसाठी निवडणूक झाली. यातील एक जागा आधी बिनविरोध झाली होती. निवडणुकीनंतर भाजपा पुरस्कृत पॅनलने वर्चस्व प्रस्थापित केले.
भाजपाने वर्चस्वाची बनवली होती निवडणूक
भाजपाने ही निवडणूक वर्चस्वाची बनवली होती. भाजपा पुरस्कृत ग्रामविकास शेतकरी सहकार पॅनलचे एकूण नऊ उमेदवारांची संचालकपदी निवड झाली आहे. यामध्ये धनंजय टिळे, एकनाथ टिळे, तानाजी कारके, गुलाब घारे, बाळासाहेब रसाळ, शंकर देशमुख, बाळासाहेब गायकवाड यांची तर महिला प्रतिनिधी माधुरी पडवळ, सावित्रीबाई टिळे यांची संचालकपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत श्री भैरवनाथ परिवर्तन शेतकरी विकास पॅनलच्या एकूण चार उमेदवारांची संचालकपदी निवड झाली आहे.