पुणे | 15 मार्च 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विटस्ट आला आहे. एकीकडे पवार घरातच बारामतीमध्ये टफ फाईट सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा अजित पवार या नणंद भावजयांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा असतानाच महायुतीच्या एका बड्या नेत्याने बंडाचं निशाण फडकावलं आहे. या नेत्याने शिंदे गटाला धक्का दिला आहे. आपण अपक्ष म्हणून बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचं या नेत्याने जाहीर केलं आहे. तसेच बारामती काही पवारांची जहांगिरदारी नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. ज्यांना 40 वर्ष मतदान केलं. आशा प्रस्थापित लोकांना बाजूला ठेवून मला संधी मिळावी हे सांगण्यासाठी मी इथं आलो होतो. बारामतीत नणंद-भावजय लढणार असल्याची चर्चा सुरू होती. मी निवडणूक लढवणार असं जाहिर केलं आणि मतदारसंघातील जोश माझ्या लक्षत आला. अनेक मत विरोधात पडत आहे. लोकशाहीत खरा न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळेच 5 लाख 80 हजार मतदारांना त्यांचा आवडीचा उमेदवार निवडून देता यावा यासाठी मी लढायचा निर्णय घेतला आहे, असं विजय शिवतारे यांनी सांगितलं.
अजित पवार यांनी 2019मध्ये मावळमधून पार्थ पवारांना उमेदवारी दिली. प्रचंड पैसे वाटप केले. दादागिरी केली. तरी देखील हरले. इथं तुम्ही काय विकास केला? आता वेळ आली आहे सगळयांनी जागरूक राहण्याची. हा मतदारसंघ काही पवारांची जहांगीर नाही. आधी पवार साहेब, नंतर त्यांची मुलगी आणि आता अजित पवार म्हणत आहेत की पत्नीला निवडून द्या. असं कसं चालेल? 40 वर्ष त्यांना मतदान केलं. आता मला करा आणि बदल पाहा. मी अपक्ष लढणार. मला मतदान करा. मी विकास करतो. सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावं. या मतदारसंघावर देशाचं लक्ष आहे, असं शिवतारे म्हणाले.
माझा लोकांशी चांगला संपर्क आहे. लोक म्हणत आहेत की, माघार घेऊ नका. 40 वर्षं यांना मतदान केलं काहीच मिळल नाही. हे लोक फक्त मतदान मागायला येतात. नंतर पाच वर्षात फिरकतही नाहीत, असं लोक मला सांगत आहेत. बारामतीतील लोकांमध्ये चीड आहे, असा दावा त्यांनी केला.
त्यांनी एकाला मोका कारवाईतून वाचवलं. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या व्यक्तीने असं बेजबाबदार विधान करणं योग्य नाही. त्यांचा मुलगा एखाद्या गुंडाला भेटतो. त्याच्यासोबत फोटो काढतो. अनेक लोकांचा वापर केला जातो. हे धोकादायक आणि चुकीचं आहे. एका बाजूला तुम्ही कोयता गँगबद्दल बोलून सगळ्यांना सरळ करण्याची भाषा करता आणि दुसरीकडे मोकातून आरोपींना वाचवता हे योग्य नाही. यातून अजित पवार यांची मानसिकता दिसून येते, असा हल्लाबोलही त्यांनी केला.