‘ही लाचारांची औलाद’, विजय वडेट्टीवार यांची अजित पवार यांच्यावर खोचक टीका
अजित पवारांवरील पडळकरांच्या टीकेवरुन सुरु झालेला वाद काही थांबताना दिसत नाहीय. त्यातच आता वडेट्टीवारांनीही दादांवर बोचरी टीका केलीय. लाचारांची औलाद आहेत, असं वडेट्टीवार म्हणालेत. त्यावरुन रुपाली ठोबरे चांगल्याच भडकल्यात.
पुणे | 22 सप्टेंबर 2023 : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत टीका केली. “लबाड लांडग्याचं पिल्लू”, अशी विखारी टीका केल्यावरही स्वत: अजित पवार काहीही बोलले नाहीत. मात्र आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही टीका करताना टोकाचे शब्द वापरले आहेत. “सत्तेच्या लाचारीसाठी पडळकरांना अजित दादांनी उत्तर दिलं नाही. त्यामुळं ही लाचारांची औलाद आहे”, असं खोचक वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय.
दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांच्या खोचक टीकेला आता अजित पवार यांच्या गटाकडून रुपाली ठोंबरेंनी पलटवार केलाय. “पडळकरांच्या विकृतीला दादांच्या कार्यकर्त्यांनीच चिरडलंय. त्यामुळे दादांवर बोलण्याऐवजी विरोधी पक्षनेत्यांनी लोकांच्या प्रश्नावर बोलावं. नाहीतर तुमची औलाद कोणती हे विचारायला भाग पाडू नका”, असं खोचक प्रत्युत्तर रुपाली ठोंबरे यांनी दिलंय.
नेमकं प्रकरण काय?
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बोलताना गोपीचंद पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जिव्हारी लागणारी टीका केली. त्याचे पडसाद आंदोलनातून उमटलेही. मात्र स्वत: अजित पवारांची काही प्रतिक्रिया आलेली नाही. ना पडळकर आपल्या टीकेवरुन मागे हटले. पण असं असलं तरी पडळकरांच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलगिरी व्यक्त केली.
लाचारांची औलाद म्हणणाऱ्यांसोबतच, अजित पवार अडीच वर्ष सत्तेत तर वर्षभर विरोधी पक्षात होते, आणि आता सत्ताधारी विशेषत: भाजपचेच आमदार, अजित पवारांना लबाड लांडग्यांचं पिल्लू म्हणतायत. म्हणजेच विरोधक आणि सत्ताधारी आमदारही अजित पवारांना टार्गेट करत आहेत.
रुपाली ठोंबरे काय म्हणाल्या?
“विजय वडेट्टीवार यांनी लक्षात घ्यावं, आम्ही तुमच्यासोबत होतो तेव्हा लाचारीचे औलाद असल्याचा उच्चार केला नाही. आम्ही संविधानिक पद्धतीने सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर तुमच्या या औलादीच्या शब्दाचा जाहीर निषेध करतो. पडळकरांसारख्या विकृतीला अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी चिरडलं आहे. पडळकर सारख्या विकृताचा अजित पवार यांनी निवडणुकीत पराभव केलाय हे बहुतेक वडेट्टीवार विसरत आहेत”, असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या.
“राहिला प्रश्न पडळकरांनी अजित पवारांवर बोलण्याबाबतचा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांचे कान ठेचले आहेत. त्यामुळे सतत अजित पवारांनी काय केलं? हे विचारण्यापेक्षा, आपण विरोदी पक्षनेते आहात. राज्यातील प्रश्नावर काम केलं तर तुमचं कर्तृत्व दिसणार आहे. वडेट्टीवार यांनी लाचारी, औलादी हे असंदिय शब्द वापरु नका, नाहीतर आम्हाला तुमची औलाद कोणती हे विचारायला भाग पाडू नका”, असं खोचक उत्तर रुपाली ठोंबरे यांनी दिलं.