Pune News : आमदारावर संतापले गावकरी, ग्रामसभा घेऊन आमदाराला केली गावबंदी
Pune News : पुणे जिल्ह्यातील आमदारासंदर्भात गावकरी आक्रमक झाले आहेत. गावकऱ्यांनी आपल्याच मतदार संघातील आमदारास गावबंदी केली आहे. आमदार असे काय बोलले की गावकरी त्यांच्याविरुद्ध संतापले आहेत...
सुनिल थिगळे, शिरूर, पुणे | 29 जुलै 2023 : राज्याच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा झाला आहे. सभागृहाचे कामकाज सुरळीत होत आहे. या दरम्यान पुणे जिल्ह्यातील आमदाराने सभागृहात केलेल्या वक्तव्यावरुन गावकरी चांगलेच संतापले आहेत. त्यांनी तातडीने ग्रामसभा आणि पालकसभा घेतली. त्यानंतर त्या आमदारास गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. गावात आल्यास तोंडाला काळे फासू, अशा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
काय आहे प्रकार
शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्याविरोधात गावकरी संतापले आहेत. तालुक्यातील बाबळेवाडी शाळाप्रकरणात आमदार पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन हा संताप आहे. आमदार अशोक पवार यांच्या वक्तव्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने ग्रामसभा आणि पालकसभा घेतली. यावेळी आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत शाळेचा प्रश्न चुकीच्या पध्दतीने मांडला, असा आरोप करत त्यांचा निषेध केला. तसेच वाबळेवाडी गावात येण्यास त्यांना बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे वाबळेवाडीसंदर्भात वक्तव्य केल्यास त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. तसेच ते दिसतील तेथे त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशाराही महिलांनी दिला.
काय बोलले आमदार
राज्याच्या विधानसभा अधिवेशनात आमदार आमदार अशोक पवार यांनी गुरुवारी प्रश्न मांडला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत २५ हजार प्रवेश फी घेवून प्रवेश दिले जात आहेत. शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर दोन व्यक्ती हे पैसे घेत असल्याचा आरोप त्यांनी सभागृहात केला. तसेच सीएसआर मार्फत झालेल्या कामांचा हिशोब जिल्हा परिषदेला शाळेकडून दिला जात नसल्याचे त्यांनी सांगितले. शाळेत स्थानिक मुले फक्त पंधरा ते वीस आहे, बाकी धनदांडग्यांची मुले असल्याचे ते म्हणाले होते.
शाळेची चुकीची माहिती
आमदार अशोक पवार यांनी शाळेची चुकीची माहिती सभागृहात दिली, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे. यामुळे ग्रामसभा घेऊन आमदार पवार यांचा निषेध करण्यात आला. तसेच त्यांना गावबंदी करुन त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा निर्णय घेण्यात आला.