Vinayak Mete Accident : विनायक मेटे अपघात प्रकरण, एर्टीगाच्या मालकाला पोलिसांनी बोलावलं, पाठलाग केला नसल्याचं स्पष्टीकरण
3 ऑगस्ट रोजी या गाडीच्या चालकासोबत सहा जण होते. त्यापैकी एकाचा वाढदिवस असल्यानं ते शिरूरला गेले होते. कारण तिथं त्यांचे नातेवाईक होते, असे पोलीस तपासात समोर आले.
पुणे : शिवसंग्राम (Shiv Sangram) संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांचे 14 ऑगस्टला पुणे-मुंबई एक्सप्रेसवर अपघाती निधन झालं. या अपघाती निधनावर (Accidental Death) त्यांची पत्नी तसेच नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याने विनायक मेटेंच्या गाडीचा दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग झाल्याचा दावा केला होता. विनायक मेटे यांच्या गाडीचा 3 तारखेला पाठलाग केला असा आरोप केलेल्या गाडी मालकाला आज पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) चौकशीला बोलावलं होतं. चौकशीत केली खातरजमा एर्टीगाच्या मालकाला रांजणगाव पोलिसांनी बोलावलं होतं. माहिती घेऊन रायगड पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. आम्ही अजूनही कारवाई केलेली नाही, फक्त चौकशीसाठी बोलावलं होतं. रायगड पोलिसांना काय लिंक लागत असेल तर तपासासाठी माहिती देण्यात आली आहे. मात्र आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने चाललो होतो. आम्ही पाठलाग केला नाही किंवा आम्हाला माहिती नाही अशी माहिती मालकाने दिली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी ही माहिती दिली.
संशयित गाडी चालकाची चौकशी
यासंदर्भात 3 ऑगस्ट रोजी विनायक मेटे त्यांच्या कार्यकर्त्यासोबत पुण्याच्या दिशेने येते होता. एक गाडी मेटे यांच्या गाडीचा पाठलाग करत होती. असा संवाद साधतानाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यानुसार पोलिसांची चौकशी सुरू आहे. रांजणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवंत मांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली. मेटे यांच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या चालकाचं नाव संदीप वीर असं आहे. त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी पोलिसांनी केली. 3 ऑगस्ट रोजी या गाडीच्य चालकासोबत सहा जण होते. त्यापैकी एकाचा वाढदिवस असल्यानं ते शिरूरला गेले होते. कारण तिथं त्यांचे नातेवाईक होते, असे पोलीस तपासात समोर आले.
विनायक चव्हाण यांचा आरोप काय
अपघाताच्या दिवशी टोलनाक्यावर विनायक मेटे दिसत नव्हते, असा दावा त्यांच्या भाच्या विनायक चव्हाणनं केला. चालक एकनाथ कदम हासुद्धा वारंवार विधानं बदलत असल्याचा आरोपही मेटे यांच्या भाच्यानं केला. मेटे यांचे सहकारी अण्णासाहेब मायकर यांनी मेटे यांचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला होता, असं वक्तव्य केलंय. 3 ऑगस्टची घटना आणि मेटेंचा अपघात झाला त्या दिवशीची घटना यात साम्य असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय.