मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पुणेकरांची मोहीम, मतदान करा अन् असे 50 रुपयांचे पेट्रोल मोफत मिळवा
pune voter free petrol: पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशन फक्त मोफत पेट्रोल देऊन थांबणार नाही. तर घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठीही मदत करणार आहे. मतदानाच्या दिवशी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मदत करणार आहे.
देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मतदानाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. या दोन्ही टप्प्यात विदर्भातील मतदारांनी उत्साह दाखवला नाही. विदर्भात यंदा २०१९ पेक्षा कमी मतदान झाले. या कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार? याचा निर्णय ४ जून रोजी होणार आहे. परंतु पुणेकरांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडल्यास त्यांना ५० रुपयांचे पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे. ‘व्होट कर पुणेकर’ या मोहिमेअंतर्गत मतदान करुन एक लिटर ऑईल खरेदी करणाऱ्यास ५० रुपयांचे पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे. पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशने ही मोहीम सुरु केली आहे.
काय आहे योजना
पुण्यातील पेट्रोल डिलर्स असोसिएशनने महा एनजीओ फेडरेशन आणि इतर स्वयंसेवी संस्थांना सोबत घेतले आहे. या संस्थांसोबत ‘व्होट कर पुणेकर’ मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार मतदान करुन आल्यानंतर बोटावरील शाई दाखवली आणि एक लिटर ऑईल खरेदी केले तर त्यांना ५० रुपयांचे पेट्रोल मोफत मिळणार आहे. पुणे लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर २० मेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे, अशी माहिती पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी दिली.
घरोघरी करणार जनजागृती
पेट्रोल डिलर्स असोसिएशन फक्त मोफत पेट्रोल देऊन थांबणार नाही. तर घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठीही मदत करणार आहे. मतदानाच्या दिवशी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मदत करणार आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांना २० हजार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
मतदान केंद्र शोधण्यासाठी वेबसाईट
निवडणूक आयोगाने मतदान केंद्र शोधण्यासाठी https://electoralsearch.in या वेबसाईटवर माहिती उपलब्ध करुन दिली आहे. देशभरातील मतदान केंद्राची माहिती त्यावर आहे. परंतु ‘व्होट कर पुणेकर’ या मोहिमे अंतर्गत आणखी एक सुविधा दिली आहे. http://www.votekarpunekar.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे. त्यावर पुणेकर मतदार केंद्र शोधू शकतील. तसेच क्यूआर कोड स्कॅन करूनही मतदान केंद्राचा शोध घेता येणार आहे.