वाल्मिक कराड याने लाखो रुपयांचा कर थकवला, आता फ्लॅटचा लिलाव होणार
Walmik karad property: नोटीस पाठवल्यानंतर वाल्मिक कराड याने त्याला उत्तर दिले नाही किंवा कर भरला नाही. त्यामुळे त्याचा फ्लॅट सील केला जाणार आहे. मग त्याचा लिलाव ही केला जाईल, असे कर संकलन विभागाचे प्रमुख अविनाश शिंदें यांनी 'टीव्ही ९ मराठी'शी बोलताना सांगितले.
valmik karad property: मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराड याचे एक एक कारनामे समोर येत आहे. वाल्मिक कराड याने मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमवली आहे. कुटुंबियांच्या नावे आणि इतरांच्या नावाने त्याने संपत्ती जमवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. पुणे शहरातही वाल्मिक कराड याने मोठ्या प्रमाणावर संपत्तीची खरेदी केल्याचा आरोप होत आहे. त्याचवेळी त्याने पुण्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा मिळकत कर थकवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड मनपाने त्याचा फ्लॅट जप्त करुन त्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या ठिकाणच्या फ्लॅटचा कर थकवला
पिंपरी चिंचवडच्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील वाल्मिक कराड याचा फ्लॅट आहे. 16 जून 2021 ला वाल्मिक कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराड याच्या नावे या फ्लॅटची नोंदणी झाली. मात्र तेव्हापासून वाल्मिक कराड याने मिळकत कर थकवला आहे. 1 लाख 55 हजार 444 रुपयांचा हा मिळकत कर थकवल्याप्रकरणी पालिकेने वाल्मिक कराडला नोटीस ही पाठवली आहे. 21 नोव्हेंबर 2024 ला धाडलेल्या नोटिशीनंतर ही कर न भरल्यानं आता हा फ्लॅट सील केला जाईल, असे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे कर संकलन विभागाचे प्रमुख अविनाश शिंदे यांनी सांगितले.
फ्लॅटचा लिलाव करणार
नोटीस पाठवल्यानंतर वाल्मिक कराड याने त्याला उत्तर दिले नाही किंवा कर भरला नाही. त्यामुळे त्याचा फ्लॅट सील केला जाणार आहे. मग त्याचा लिलाव ही केला जाईल, असे कर संकलन विभागाचे प्रमुख अविनाश शिंदें यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले.
वाल्मिक कराड याने पुणे येथील मगरपट्टयात संपत्ती घेतली आहे. तसेच त्याने एफसी रोडवर ऑफीस घेतले आहे, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी पैठण येथील जाहीर सभेत केला होता. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी वाल्मिक कराड याच्या संपत्तीची ईडी चौकशी करण्याची मागणी केली आहे.