मान्सून आला, पण पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट, काय आहे कारण?
Pune News : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. परंतु यंदा मान्सूनने बराच उशीर केला. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनला उशीर झाला. त्याचा फटका शेतीला बसला तसाच शहरवासियांनाही बसणार आहे. पुण्यात पाणी टंचाईचे संकट आहे.
रणजित जाधव, पुणे : यंदा मान्सूनचे आगमन उशीराने झाले. केरळमध्ये दरवर्षी १ जून रोजी येणारा मान्सून दाखल होतो. परंतु यंदा ४ जून रोजी मान्सून आला. त्यानंतर राज्यात ८ जून रोजी दाखल होणारा मान्सून तब्बल २५ जून रोजी आला. पुणे शहरात २५ जून रोजी मान्सून दाखल झाला. त्यानंतर पुणे शहर अन् जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरु आहे. गेल्या चार, पाच दिवसांपासून सूर्यदर्शनही झाले नाही. त्यानंतरही पुणे शहरातील काही भागांत पाणी टंचाईचे संकट आहे. या ठिकाणी ३० जूनपर्यंत आढावा घेऊन पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येणार आहे. पाणी कपातीचा संकटाबरोबर शेतीलाही यंदा फटका बसला आहे. सर्वत्र पेरणी उशिराने झाली आहे.
कुठे असणार पाणी कपात
पुणेमधील पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपातीचे संकट निर्माण झालंय. पिंपर चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ 16 टक्के पाणीसाठा सध्या आहे. तसेच पवना धरण परिसरात अजून ही समाधानकारक पाऊस पडत नाही. त्यामुळे 30 तारखेपर्यंत परिस्थिती पाहून पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलंय. त्यामुळे यंदा उशिराने आलेल्या मान्सूनचा फटका पिंपरी चिंचवडकरांना बसला आहे.
यंदा उशिराने आलेल्या मान्सूनमुळे राज्यात सर्वत्र शेतकरी चिंतातूर झाले होते. दरवर्षी राज्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात होणारी पेरणी, यंदा जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरु झाली. यामुळे उशिराने आलेल्या मान्सूनचा फटका शेतीक्षेत्राला चांगलाच बसला. आता पाऊस आला तरी आता अनके ठिकाणी पेरणीसाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही.
कोयना धरणातील दोन प्रकल्प सुरु
पुणे शहर अन् परिसरातील धरणांमध्ये जलसाठा कमी झाल्यामुळे पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. त्याचवेळी कोयना धरण पाणलोट क्षेत्रासंदर्भात समाधानकारक पाऊस होत आहे. यामुळे या धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले वीजगृह पुन्हा सुरु करण्यात आले आहे. धरणातून वीजगृहासाठी २१०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यात वीज टंचाई निर्माण होणार नाही.