Manoj Jarange Patil : वळवळ करू नका, आता एक घंटाही वेळ देणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
मराठा आरक्षणावर त्यांनी पर्याय मागितला. आंदोलन आम्ही करायचं, जागा आमची, पर्यायही आम्ही द्यायचा. तर तुम्ही काय करता? मी पर्याय दिला. कारण आंदोलन ताणून धरायचं नाही. पुरावा दिला. आरक्षण द्या म्हणालो. कारण आधार हा आधार असतो.
रवी लव्हेकर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, पंढरपूर | 21 ऑक्टोबर 2023 : आरक्षण देण्यासाठी सरकारने आपल्याकडे 30 दिवस मागितले. आम्ही त्यांना 40 दिवस दिले. त्यांना आश्चर्य वाटलं. एवढे दिवस दिलेच कसे? आपण त्यांना मुद्दाम 40 दिवस दिले. कारण त्यांना बहाणा हवा होता. त्यांनी आरक्षण दिलं असतं आणि ते टिकलं नसतं तर तुम्ही वेळ दिला नाही. त्यामुळेच आरक्षण टिकलं नाही असं सांगून आरक्षण न देण्याचा सरकारचा डाव होता. पण आपण त्यांना 30 ऐवजी 40 दिवस दिले आणि त्यांचा डाव उधळून लावला, असं सांगतानाच आता सरकारने वळवळ करू नये. अजून एक दोन दिवस वाढवून मागितलं जाईल. पण एक दोन दिवस तर काय एक घंटाही मिळणार नाही. आरक्षण द्यावंच लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील यांची आज अकलूज येथे भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. मी कामाला लागलोय. शब्द देतो आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही आम्ही मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. तुमचा मतलब आरक्षणाशी आहे. कसंही मिळो. मलाही कसंही मिळो,आरक्षण घेऊच. शांततेच्या आंदोलनानं आरक्षण घेऊ. निर्णयाच्या प्रक्रियेपर्यंत आलो आहोत. सरकारच्या टेबलवर तेवढीच फाईल आहे. दुसरं कामच नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
जाळपोळ करू नका
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना कार्यक्रमही दिला. तुमचं सर्कल, जिल्हा आणि तालुक्यात तयारी सुरू करा. गाफिल राहू नका, सरकारची जशी कसोटी तशी आपलीही आहे. एकही गाव सोडू नका. घराघरात जा. मराठ्यांना आरक्षण कशासाठी पाहिजे हे समजून सांगा. एकत्रित का यायचं हे सांगा. उग्र आंदोलन करू नका. जाळपोळ करू नका. आपल्या पोरांवर केसेस होतात. शिक्षण आणि नोकरीत अडचणी होतील. महाराष्ट्रातील एकाही पोरानं आत्महत्या करायची नाही. पोरं मरायला लागली तर आरक्षण घ्यायचं कशाला? आणि कुणासाठी? असा सवाल त्यांनी केला.
आता सुटका नाही
आता सुटका नाही. त्यांनी अनेक डाव टाकले पण आपण उधळून लावलेत. एक मातब्बरांची टिम माझ्याकडे आली. बोलणं झाल्यावर म्हणाले कोपऱ्यात चल मी म्हणालो मी घरंदाज मराठा आहे. मी कोपऱ्यात येत नसतो. जे काही बोलायचं ते समोरच बोला. सगळे पक्ष, गट तट बाजूला ठेवा आणि मराठा समाजाला आरक्षणाच दान टाकून द्या, असंही ते म्हणाले.