पाऊस, ढगफुटी, गारपिटीची माहिती आता पुणे शहरातून मिळणार, काय आहे नवीन प्रणाली
Pune weather Update : पाऊस, ढगफुटी, गारपिटीचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. नुकताच आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळादरम्यान तंत्रज्ञानामुळे मोठी मदत मिळाली अन् नुकसान कमी झाले.
रणजित जाधव, पुणे | 16 जुलै 2023 : शेतकरी अन् प्रशासनाची स्थानिक हवामान अंदाज अधिक अचूक आणि वेळेत वर्तविण्यासाठी आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामुळे पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी, गारपीट या सर्व गोष्टींचा अंदाज आधीच कळू शकणार आहे. पुणे शहरात आता त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हवामानासंदर्भात पूर्वसूचना देण्यासाठी पुण्यात ‘वेदर डॉप्लर रडार’ बसवण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र संस्थेचे प्रमुख डॉ. के.एस.होसळीकर यांनी दिली.
काय आहे वेदर डॉप्लर रडार
वेदर डॉप्लर रडार हे हवामान अंदाजासंदर्भात वापरले जाणारे नवीन तंत्र आहे. त्याचा वापर आता जगभरात होत आहे. महाराष्ट्रात नागपूर अन् मुंबईत सध्या हे रडार आहे. राज्यात पुण्यासह आणखी चार ठिकाणी वेदर डॉप्लर रडार बसवण्यात येणार आहे. हे रडार विद्युत चुंबकीय लहरी ढगांवर सोडतो. त्यानंतर ढग सरकत असतानाही अचूक माहिती रडारच्या माध्यमातून मिळते. यामुळे पावसाची, ढगफुटीची, गारपिटीची ही सर्व माहिती किमान सहा ते चार तास आधी मिळू शकते. त्याचा फायदा प्रशासन अन् शेतकऱ्यांना होऊ शकतो. ही माहिती मिळाल्यानंतर प्रशासनास उपाययोजना करता येतील.
पुण्यात जागेचा शोध सुरु
महाराष्ट्रात दोन रडार आहे. तसेच गोवा आणि तेलंगणातील रडारचाही महाराष्ट्राला फायदा होतो. अजून चार रडार बसवण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्यात जागेचा शोधही सुरु आहे. वातावरणात सध्या मोठे बदल होत आहे. पाऊस, अतिवृष्टी कधीही होऊ लागली आहे. त्यामुळे अशा रडारची गरज निर्माण झाली आहे.
पुण्यात हे मिळणार
देशाला हवामानाच्या अंदाजासाठी सुपर कॉम्प्युटर मिळणार आहे. भारताकडे लवकरच 18 पेटाफ्लॉप सुपर कॉम्प्युटर येणार आहेत. यामुळे हवामानाचा अचूक अंदाज वर्तवला जाणार आहे. मार्च २०२४ पासून भारत सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणार आहे. सुपर कॉम्प्युटरची किंमत 900 कोटी आहे. हे सुपर कॉम्प्युटर पुणे शहरात बसवले जाणार आहे. त्याचा मोठा फायदा देशाला होणार आहे.