पुणे: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या ग्रामदैवतांचा यात्रा उत्सव सुरू आहे. या उत्सवात आता गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मागणी वाढत आहे. पूर्वी यात्रा जत्रा म्हटलं की लोककला असलेल्या तमाशाला मोठ्या प्रमाणात मागणी होती. मात्र आता सध्या सर्वत्र यात्रा उत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रम पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. या निमित्ताने गौतमी पाटीलला तिच्या नृत्याबाबत विचारलं. तिचं नृत्य अश्लील असल्याचा आरोप केला जातो, यावरही विचारण्यात आलं. त्यावर गौतमीने अत्यंत शांतपणे उत्तर दिलं. माझं नृत्य अश्लील नाही. आता माझी चूक दाखवा अन् माझ्यावर गुन्हा दाखल करा, असं थेट आव्हानच गौतमी पाटीलने दिलं आहे.
माझी चूक काय आहे ते दाखवा आणि गुन्हा दाखल करा. आता माझ्याकडून काही चूक होतेय असं मला वाटत नाही. यापूर्वी माझ्याकडून चूक झाली होती. त्यावेळी मी माफीही मागितली होती. त्यानंतर मी बऱ्याच सुधारणा केल्या. नृत्यात अश्लीलता येऊ नये म्हणून मी खबरदारी घेते. आता मी लावणी करते. पण त्यापेक्षा वेस्टर्न नृत्य अधिक करते, असं गौतमी पाटीलने स्पष्ट केलं.
अकलूजच्या लावणीपासून आतापर्यंतचा प्रवास चांगला होता. आता खूप लोड आला आहे. कोणीही शून्यातूनच पुढे येतो. तशी मी आली आहे. आता पुढील करिअर हा नशिबाचा खेळ आहे, असं तिने सांगितलं.
चित्रपटात काम करणं सुरू आहे. अजून दोन तीन गाणी सुरू आहेत. माझ्या या नव्या प्रोजेक्टला प्रेक्षकांनी भरभरून साथ द्यावी, असं आवाहन करतानाच चित्रपटात काम सुरू असतानाच सांस्कृतिक कार्यक्रमही सुरूच ठेवणार असल्याचं तिने स्पष्ट केलं.
प्रेक्षकांचे प्रेम असल्याने ग्रामीण भागात कार्यक्रमाला मागणी वाढत आहे. पण मला कुणाच्या पोटावर पाय द्यायचा नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेक्षकांसाठी नवीन लावणी सादर करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
गौतमी पाटील अल्पावधीतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं आहे. लावणी नृत्यांगणा म्हणून गौतमीने नावलौकिक मिळवला आहे. गौतमी ही मूळची धुळ्याची आहे. सप्टेंबर 2022मध्ये एका शोमध्ये तिने डान्सच्या काही अश्लील स्टेप्स केल्या होत्या. त्यामुळे तिचा हा डान्स वादग्रस्त ठरला होता. या डान्सवरून तिच्यावर प्रचंड टीकाही झाली होती.
लावणी कलावंतांनीही गौतमीच्या डान्सवर आक्षेप घेतला होता. मराठी सिनेसृष्टीतूनही त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. गौतमीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीनेही जोर धरला होता. त्यानंतर तिने जाहीरपणे माफी मागितली होती.