यंदा गृहिणींना चपातीचे चटके बसणार…किचनचे बजेट कोलमडणार
Framer News | कमी पाऊस आणि धरणांमध्ये अल्प असलेला धरणसाठा यामुळे रब्बीचे क्षेत्र यंदा कमी झाले आहे. गव्हापेक्षा हरबऱ्याची पेरणी जास्त झाली आहे. पुणे जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा केवळ ५० टक्के भागावर गव्हाची पेरणी झाली आहे.
मावळ, पुणे, रणजित जाधव, दि.24 डिसेंबर | शेतीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाची कास धरत अनेक जण शेती करु लागले. परंतु शेती नेहमी फायद्याचा व्यवसाय राहिला नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका नेहमी शेतीला बसतो. यंदा मॉन्सूनने सरासरी गाठली नाही. कमी पाऊस झाल्याचा परिणाम रब्बी हंगामावर झाला आहे. तसेच यंदा थंडी पडत नाही. त्याचा फटका रब्बी हंगामाला बसणार आहे. यंदा राज्यात आणि पुणे जिल्ह्यात गव्हाची लागवड कमी झाली आहे. गव्हाची लागवड कमी झाल्यामुळे गहू महाग होणार आहे. यामुळे चपातीचे चटके किचन सांभाळणाऱ्या गृहिणींना बसणार आहे. आधीच भाकरी महाग झाली आहे. आता चपातीही महाग होणार आहे.
पुणे जिल्ह्यात गहू पेरणी केवळ ५० टक्के
पुणे जिल्ह्यांत गव्हाची पेरणी घटली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पेरा तब्बल 21 हजार हेक्टरने कमी झाला आहे. गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यात 43 हजार 637 हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली होती. पुणे जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात आतापर्यंत केवळ 22 हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. म्हणजेच गव्हाची पेरणी केवळ ५० टक्के भागावर झाली आहे. यामुळे यंदा गव्हाचे उत्पन्न कमी होणार आहे. गव्हाचे उत्पन्न कमी झाल्यामुळे गहू महाग होणार आहे. यामुळे चपातीचे चटके गृहिणींना बसणार आहे. जिल्ह्यात यंदा 22 हजार 312 हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 5 हजार 300 हेक्टर वर जुन्नर तालुक्यात गावाची पेरणी झाली आहे तर सर्वात कमी मावळ तालुक्यात केवळ 123 हेक्टरवर पेरणी झाली आहे.
ज्वारी, बाजारी महाग
किरकोळ बाजारात ज्वारी ७० ते ८० रुपये किलो आहे. बाजरी ४५ ते ५० रुपये किलो आहे. यामुळे आधीच भाकरी महाग झाली असताना गव्हाचा दर यंदा उच्चांक गाठणार आहे. यामुळे भाकरीनंतर आता चपाती महाग होणार आहे. सध्या असलेले ढगाळ वातावरण तसेच काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा सध्या रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. कमी पाऊस आणि धरणांमध्ये अल्प असलेला धरणसाठा यामुळे रब्बीचे क्षेत्र यंदा कमी झाले आहे. गव्हापेक्षा हरबऱ्याची लागवड जास्त झाली आहे.