कोण आहेत वारे गुरुजी?, राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर भेटीचं आवतन का दिलं?
जिल्हा परिषदेच्या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाची करणाऱ्या वारे गुरुजी यांचं निलंबन अखेर रद्द झालं आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचं उघड झाल्यानंतर त्यांना दोषमुक्त सिद्ध करण्यात आलं.
पुणे | 25 सप्टेंबर 2023 : एका खेड्यातील शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाची किमया करणारे दत्तात्रय वारे गुरुजी अखेर एका प्रकरणातून दोषमुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या दत्तात्रय वारे गुरुजींना आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा बनवल्याप्रकरणी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना राष्ट्रपती पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे. वारे गुरुजींची दखल खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. राज ठाकरे यांनी वारे गुरुजींना शिवतीर्थावर बोलावलं आहे. राज ठाकरे हे वारे गुरुजी आणि ग्रामस्थांचा सत्कार करणार आहे. गणेशोत्सवानंतर ही भेट होणार आहे.
कशी होती परिस्थिती?
शिरूर तालुक्यातील शिक्रापूरपासून अडीच किलोमीटरच्या अंतरावर वाबळेवाडी गाव आहे. या गावात 50 ते 60 घरे आहेत. या गावातील लोकसंख्या 400 च्या आसपास आहे. या गावातील जालिंदर नगरमध्ये दोन खोल्यांची शाळा होती. या शाळेच्या भिंती पडक्या झाल्या होत्या. खोल्याही गळक्या होत्या. तशाच परिस्थितीत विद्यार्थी या शाळेत शिकत होते. शाळेत 8 ते 10 विद्यार्थी शिकत होते.
या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर दत्तात्रय वारे गुरुजी यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेतलं. त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं आणि शाळेचा कायापालट केला. वारे गुरुजींनी ही शाळा काचेची बनवली. शालेय अभ्यासक्रमाशिवाय शाळेत 16 वेगवेगळे विषय शिकवले जाऊ लागले. जपानी भाषेसह इतर भाषाही शिकविल्या जाऊ लागल्या.
त्यामुळे या शाळेची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतल्या गेली. थेट स्वीडनच्या गोटलँड आणि एमजी स्कूलशी त्यांनी सामंजस्य करार करून शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा म्हणून लौकीक मिळवून दिला. आज ही शाळा अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून ओळखली जाते.
काय आहे प्रकरण?
दरम्यान, स्थानिक राजकारणातून वारे गुरुजींवर आरोप करण्यात आले. त्यांच्यावर शाळेच्या प्रवेश प्रक्रियेत आणि शाळेला मिळालेल्या निधीत गैरप्रकार केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी सुरू झाली. अखेर दोन वर्षाच्या चौकशीनंतर कोणताही सबळ पुरावा न मिळाल्याने या समितीने गुरुजींना क्लीनचिट दिली. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेनेही वारे गुरुजी यांना दोषमुक्त केलं आहे. तसे आदेशच जिल्हा परिषदेचे सीईओ रमेश चव्हाण यांनी दिले आहेत.
चप्पल घालणे बंद
वारे गुरुजी यांच्यावर अपहाराचे आरोप झाले. त्यामुळे ते व्यथित झाले होते. त्यामुळे त्यांनी निलंबन होताच पायात चप्पल घालणे बंद केलं. परंतु, आता दोषमुक्त झाल्यावरही त्यांनी चप्पल घालण्यास सुरुवात केली नाही. आपण चप्पल घालावी की नाही याचा निर्णय वाबळेवाडीकरांनी घ्यावा, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ग्रामस्थ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोण आहेत वारे गुरुजी?
वारे गुरुजींचं पूर्ण नाव दत्तात्रय वारे असं आहे. पण वारे गुरुजी म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत. डिसेंबर 1996 पासून त्यांनी शिक्षकीपेशाला सुरुवात केली. गरदरेवाडीतून त्यांनी शाळेत शिक्षक म्हणून सुरुवात केली. विशेष म्हणजे ती शाळा नव्यानेच बांधली होती. शाळेचा आणि वारे गुरुजींचा शाळेचा पहिलाच दिवस होता. ही शाळा दुर्गम भागात होती. गावाच्या आजूबाजूला दोन नद्या होत्या. शाळेपर्यंत जायला धड रस्ताही नव्हता. अशा ठिकाणी त्यांनी शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांची बदली जातेगाव खुर्दमध्ये झाली. जातेगाव खुर्दमध्ये त्यांनी 11 वर्ष काम केलं. नंतर ते वाबळेवाडीत आले. जे प्रयोग आधीच्या दोन शाळेत राबवले होते. तेच त्यांनी वाबळेवाडीत राबवले होते. वाबळेवाडीत जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.
वाबळेवाडीच्या शाळेची पटसंख्या वाढवण्यापासून ते शाळेचा कायापालट करण्यापर्यंत वारे गुरुजींना अथक प्रयत्न करावे लागले. कारण अनेक पालकांना आपली मुलं सीबीएसई शाळेत शिकावी असं वाटत होतं. त्यामुळे ते वाबळेवाडीच्या शाळेकडे फिरकत नव्हते. मात्र, वारे गुरुजी आणि त्यांच्या टीमने हे चित्र बदललं. आज या शाळेत प्रवेश घेण्यासाठी 2500 विद्यार्थी वेटिंगवर आहेत. एवढा बदल वारे गुरुजी यांनी घडवून आणला आहे. निलंबनानंतर त्यांची आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बदली करण्यात आली होती.