पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक रंगली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये पक्षाची बाजू मांडण्यावरून वाद झाला आहे. राऊत यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्या सारखं बोलू नये. त्यांनी आमचं वकीलपत्र घेऊ नये, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर शिवसेना फुटली होती तेव्हा तुम्ही आमचं वकीलपत्र का घेतलं होतं? असा रोखठोक सवाल संजय राऊत यांनी केला आहे. आज तर अजित पवार यांनी कोण संजय राऊत? असा सवालच भर पत्रकार परिषदेत विचारला आहे. त्यामुळे अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात वाद रंगण्याची चिन्हे अधिकच दिसत आहे.
अजित पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत तुमची अजूनही बाजू मांडत आहेत. तुमच्या पक्षाची बाजू मांडत आहेत, असं अजित पवार यांना विचारलं. त्यावर कोण संजय राऊत? असा सवाल अजित पवार यांनी केला. शिवसेनेचे प्रवक्ते… खासदार… असं पत्रकारांनी अजितदादांना सांगितलं. तेव्हा, मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं. कुणाच्या अंगाला का लागावं? माझा पक्ष आणि आमच्या पुरतं आम्ही बोललो होतो, असं अजित पवार म्हणाले.
संजय राऊत राष्ट्रवादीची भूमिका मीडियात मांडत असल्याने अजित पवार यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता. इतर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखच चाललंय. त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठाऊक. पार्टीची मिटिंग जेव्हा होईल तेव्हा मी विचारणार आहे. तुम्ही ज्या पक्षाचे आहात त्या पक्षाविषयी सांगा ना…काय सांगायचं ते. तुमच्या पक्षाच्या मुखपत्राबद्दल बोला. पण आम्हाला कोट करून ते असं झालं… तसं झालं… फलानं झालं… असं सांगत आहेत. आम्ही आमची स्पष्ट भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र कुणी घेण्याचं कारण नाही, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी उत्तर दिलं होतं.
महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून खापर फोडत आहेत का? मी महाविकास आघाडीचा चौकीदार आहे. माझ्यावर खापर का फोडत आहात. फोडण्याचं कारण काय आहे. जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तुम्ही आमची वकिली करत होतात. तेव्हा प्रत्येकाचं कर्तव्य आहे की, आपल्या बरोबरचा घटक पक्ष मजबूत राहावा. त्याचे लचके तुटू नये. त्यासाठी जर कोणी आमच्यावर खापर फोडत असेल तर जरा गंमत आहे, असं राऊत म्हणाले होते.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार यांनी अदानी यांची भेट घेतली नाही. तर अदानी हे शरद पवार यांच्या भेटीला आल्याचं मी वाचलं. अदानी यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. शरद पवार यांचे अनेक उद्योगपतींशी संबंध आहेत. अदानी यांच्यासोबतही आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्यात काही गैर नाही, असं सांगतानाच अदानी-पवार भेटीशी महाविकास आघाडीशी संबंध नाहीये, असं त्यांनी स्पष्ट केलं.