तू तिथे मी नाहीच… शरद पवार असणाऱ्या कार्यक्रमात अजितदादा का जात नाही?; सुप्रिया सुळे यांचं उत्तर काय?
राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्याला कारणही तसं आहे. पक्षाच्या फुटीनंतर अजितदादा यांनी प्रत्येक भाषणातून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांच्या वयाच्या मुद्द्यावरून अजितदादांनी जोरदार हल्ला चढवला आहे. थेट पुतण्याकडूनच काकांवर हल्ला होत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 14 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काही कौटुंबिक कार्यक्रम आणि काही सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र दिसले होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील दुरावा काही अंशी कमी झाल्याची चर्चा होती. पण राष्ट्रवादीच्या फुटीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात गेलं. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील दरी अधिकच वाढली. त्यातच अजितदादांनी वयाचा मुद्दा काढून पवारांवर वारंवार हल्ला चढवला. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील दरी वाढत गेली. ती एवढी की जिथे शरद पवार असतील त्या कार्यक्रमात जाणं अजितदादांनी टाळण्यास सुरुवात केली आहे. त्यावर, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
साखर कारखान्याचा कार्यक्रम असो की मराठी नाट्य संमेलन असो, दोन्ही ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार यांना निमंत्रण होतं. पण कोणताही कार्यक्रम न चुकवणाऱ्या अजितदादांनी या दोन्ही कार्यक्रमांना दांडी मारली आहे. केवळ शरद पवार या कार्यक्रमांना असल्यामुळे अजितदादांनी या कार्यक्रमांना जाणं टाळलं आहे. यावर सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी सावध विधान केलं आहे. शरद पवार असणाऱ्या कार्यक्रमात अजित पवार का जात नाही? हे अजित पवारच सांगू शकतात, मी नाही, अशी सावध प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या विधानाने अजितदादा मुद्दाम पवार असलेल्या कार्यक्रमात जात नसल्याचंही अधोरेखित झालं आहे.
भाजप काँग्रेसमय
काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मिलिंद देवरा यांना माझ्या शुभेच्छा आहेत. भाजप आता काँग्रेसमय झाला आहे. भाजपमध्ये टॅलेंट नाहीय का? भाजपमध्ये नेते नाहीत का?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
भाजप जवाब दो
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांवर टीका केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया करत भाजपला फैलावर घेतलं आहे. नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य भाजपला मान्य आहे का? भाजप जबाब दो, असं आव्हान त्यांनी दिलं.
मुंडेंचा विसर पडलाय
बीडच्या सभेमध्ये मुंडेंच्या कुटूंबियांना दूर ठेवण्याचं काय षडयंत्र आहे का? गोपीनाथ मुंडेचा भाजपला विसर पडलाय, कालच्या सभेला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे उपस्थित राहायला पाहिजे होते, असंही त्यां म्हणाल्या.
शरद पवारच सांगतील
इंडिया आघाडीत अध्यक्षपद आणि संयोजकपद अशी दोन पदे निर्माण केली जाणार आहेत. त्यावर विचारलं असता सुप्रिया सुळे यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. इंडिया आघाडीच्या बैठकीला मी उपस्थित नव्हते, त्यामुळे दोन पद निर्माण करण्याच्या प्रश्नावर शरद पवारच सांगू शकतील, असं त्या म्हणाल्या.