पवार साहेब, एका वाक्यात उत्तर द्या; आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या मंत्र्याने शरद पवारांना घेरलं
दरवर्षी दोन तीन दिवस प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी प्रशासन सगळं करतं. काठावरील गावांना शिफ्ट केलं जातं. अनेक वेळा त्या ठिकाणच्या लोकांची अपरिमीत हानी होते. तीन आठवडे अगोदर अशी स्थिती झाली होती. आता तशी होऊ नये एवढीच देवाकडे प्रार्थना आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कोल्हापूरात पंचनामे सुरू झाले आहेत, अशी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवार यांनी राज्य सराकरचे चांगलेच कान टोचले आहेत. सरकारने दोन्ही समाजाच्या नेत्यांशी परस्पर चर्चा केली. त्यामुळे वाद वाढत गेला. दोन्ही समाजाच्या नेत्यांसोबत एकत्र चर्चा केली असती तर वाद वाढला नसता. सरकारची हीच मोठी चूक होती, अशा शब्दात शरद पवार यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. शरद पवार यांच्या या टीकेचा भाजप नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे. पवारांनी मुख्यमंत्री असताना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण का दिलं नाही? याचं एका वाक्यात उत्तर द्या, असं आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
शासन चूक काय होते, तो नंतरचा विषय आहे. पण शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? एका वाक्यात उत्तर द्या. मराठा समाजाला कुणबी ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नाही सांगा. विरोधकच मनोज जरांगे यांना पाठिंबा देत आहेत. मात्र विरोधक सत्ताधारी या सर्वांनी मिळून मनोज जरांगे यांना समजावलं पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
जरांगेंनी यावं
जेव्हा बैठक बोलावली तेव्हा शरद पवार आले नाहीत. आणि आता या विषयावर बोलत आहेत. बैठक घेतल्यावर मनोज जरांगे यांनी आता स्वत: उपस्थित राहिलं पाहिजे. मुख्यमंत्री बैठक बोलावतीलच, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
सगेसोयरे वादातून शासन मागे गेलेले नाहीय. सरसकट आरक्षण देणाची आता मागणी आहे. मातृ आणि पितृ अशी मागणी आहे. ओबीसी समाजाचा म्हणणं आहे की, कुणबी आहे त्यांना कशाला? या दोन्ही मागण्या होताना दिसत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
ते मोदींचं मोठेपण
शरद पवार साहेब काय म्हणतील काही माहिती नाही. पण जेव्हा गरज होती तेव्हा शरद पवार यांनी आपल्याला मदत केली, असं मोदी जाहीरपणे सांगत असतात. हे मोदींचं मोठेपण आहे. शरद पवार यांचं मोठेपण ते मान्यच करत आहेत. त्यामुळे त्यावर पडदा टाकण्याचं काम थोडीच होणार आहे, असंही ते म्हणाले.
ते काम त्रिमूर्तीचं
जागा वाटपाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्याशी बोलणं करण्याचं काम आमची त्रिमूर्ती करत आहे. ते सांगतील ते आम्ही मानू. जागा वाटप, बोलणं या सर्व गोष्टी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री करत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.