पुण्यात बदला घेण्याचा मुळशी पॅटर्न | किशोर आवारे यांचे हत्येसाठी हे ठरलं एक महत्त्वाचं कारण
किशोर आवारे हत्याकांडानंतर संपूर्ण पुणे जिल्हा हादरला. यानंतर या हत्येमागील कारण अखेर पोलिसांनी शोधून काढलं आहे. किशोर आवारे यांची अचानक अशी हत्या का करण्यात आली. या मागील कारण पोलिसांनी २४ तासानंतर शोधून काढलं आहे.
मुंबई : पिंपरी-चिंचवड परिसरातील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची 12 मे रोजी भर दुपारी तळेगाव – दाभाडे नगरपरीषदेच्या इमारती समोरच अत्यंत निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर हादरले. या हत्येच्या दुसऱ्या दिवशीच मुख्य सूत्रधारासह सहा जणांना अटक केली. या हत्येमागचा मुख्य सूत्रधार असलेला गौरव खळदे हा माजी नगरसेवक भानु उर्फ चंद्रभान खळदे यांचा मुलगा आहे. पेशाने इंजिनियर असलेला गौरव खळदे अत्यंत शांत स्वभावाचा आहे. कुटुंबाच्या अनेक व्यवसायापैकी बांधकाम व्यवसाय तो सांभाळत होता. अत्यंत शांत स्वभावाच्या गौरव खळदे यांनी किशोर आवारे यांची हत्या का केली असा सवाल निर्माण झाला आहे.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात गौरव याचे वडील भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात वाद झाला होता. तळेगाव – दाभाडे नगर परिषदेमध्ये मुख्याधिकाऱ्यासमोर आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली मारली होती. त्यावरून गौरव याचे मित्र त्याला सारखे चिडवायचे तुझ्या वडीलांच्या कानाखाली सर्वांसमोर वाजविली ! आपल्या वडीलांच्या सर्वांसमोर झालेल्या या अपमानाचा बदला गौरव याला घ्यायचा होता. म्हणून त्याने त्याचा एक मित्र श्याम निगडकर याची मदत घेतली. श्याम निगडकर याला गौरव अडीअडचणीला पैशांची मदत करायचा. गौरव याने श्यामला आवारे यांच्या हत्येची सुपारी दिली.
श्याम निगडकर याने त्याच्या प्रविण धोत्रे आणि अन्य मित्रांची मदत घेऊन आवारे यांच्या हत्येचा कट रचला. जानेवारीपासूनच त्यांनी आवारे यांच्यावर पाळत ठेवणे सुरू केले. त्यानंतर शेवटी 12 जानेवारी रोजी जेथे ज्या तळेगाव – दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीच्या खाली श्याम निगडकर आणि त्याच्या तिघा साथीदारांनी घेरून आवारे यांच्यावर आधी गोळीबार केला नंतर त्यांच्यावर कोयत्याचे वार करीत त्यांना ठार केले. त्यानंतर हल्लेखोरांनी दुचाकीस्वारांना पिस्तुलाचा धाक दाखवित त्यांच्या दुचाकीवरून पलायन केले. परंतू पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी हल्लेखोरांसह सहा जणांना अटक करुन हा संपूर्ण कट उघडकीस आणला.