१२२ वर्षानंतर फेब्रुवारी महिना ठरला सर्वाधिक हॉट, का वाढतेय तापमान?
फेब्रुवारी महिन्यात सरासरी तापमान चांगलेच वाढले होते. १९०१ नंतर हे सर्वाधिक सरासरी तापमान होते. तसेच यंदा मार्चमध्येही तापमानाचा नवा विक्रम होऊ शकतो.
पुणे : यंदाचा २०२३ ची सुरुवात कडाक्याच्या थंडीने झाली होती. देशभरात थंडीची लाट पसरली होती. यामुळे यंदा तापमान कमी राहणार, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु यंदा फेब्रुवारी महिना १९०१ नंतर आतापर्यंतचा सर्वात उष्ण राहिला. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार यंदा फेब्रुवारी महिन्यात सरासरी तापमान २९.५ अंश सेल्सियसवर गेले होते. १९०१ नंतर हे सर्वाधिक सरासरी तापमान होते. तसेच यंदा मार्चमध्येही तापमानाचा नवा विक्रम होऊ शकतो. फेब्रुवारी २०२३ मध्ये देशातील सरासरी तापमानाने २९.५ अंश सेल्सियसवर जाऊन पोहचले होते. यापूर्वी २०१६ मध्ये सरासरी तापमान सर्वाधिक २७.८ अंश होते.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १९०१ पासून ते आतापर्यंत फेब्रुवारी २०२३ चे कमाल तापमान सर्वाधिक राहिले. तसेच किमान तापमान पाचव्या स्थानी राहिले. देशातील मध्य भारतात मार्चमध्येच उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशामध्येच अधिक तापमान
फेब्रुवारीत उत्तर व पश्चिम भारत म्हणजे राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, यूपी सरासरी कमाल तापमान ३.४० अंश जास्त होते. या भागात २४.८६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. यापूर्वी १९६० मध्ये ते २४.५५ अंश होते. मध्य भारतासाठी म्हणजेच मप्र, महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरातमध्ये आतापर्यंतचा दुसरा सर्वात उष्ण फेब्रुवारी ठरला. यंदा येथे फेब्रुवारीचे सरासरी कमाल तापमान ३१.९३ अंश राहिले. २००६ मध्ये ते ३२.१३ अंश होते.
का वाढतेय तापमान
एका रिपोर्टनुसार, गरम हवा वाहण्यामागे अनेक कारणे आहेत. वसंत ऋतूमध्ये वारा सहसा पश्चिम-वायव्येकडून वाहतो. या दिशांनी वाहणाऱ्या वाऱ्यामुळे, मध्यपूर्वेतील इतर प्रदेशांपेक्षा मध्यपूर्व प्रदेश अधिक वेगाने गरम होत आहे. तसेच विषववृत्ताच्या जवळ अक्षांश आहेत आणि ते भारताच्या दिशेने वाहणाऱ्या उबदार हवेचा स्रोत म्हणून काम करते.
तसेच वायव्येकडून वाहणारे वारे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या पर्वतरांगांवर वाहतात. जे भारतात वाहणारे वारे तापवत आहेत. ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही हवामानात अशाप्रकारे बदल होताना दिसत आहेत, मात्र गेल्या काही वर्षांत हा प्रकार अधिकच पाहायला मिळत आहे. वातावरणात हळूहळू होत असलेल्या बदलांमुळे हवामानाचे स्वरूप बदलत असून उन्हाळ्याचे दिवस वाढत आहेत.
तापमान लवकर का वाढले
फेब्रुवारीचे तापमान आणि मार्च महिन्यातील उष्णतेचा अंदाज पाहता उष्णतेची लाट लवकरच सुरू होणार आहे. पावसाचा अभाव हे प्रमुख कारण आहे. मैदानी आणि डोंगराळ भागात पावसाची कमतरता दिसून आली. कमी पावसाचा परिणाम म्हणून हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश या भागात तापमानात झपाट्याने वाढ झाली.