Sharmila Thackeray : इतर पक्षांवर टीका करण्यापेक्षा माझा नवरा, माझा मुलगा काय करतो, यावर मी लक्ष ठेवून; शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया
शिवनसेनेच्या सध्याच्या परिस्थितीवर विचारणा केली असता, त्यांनी नो कॉमेंट्स असे उत्तर दिले. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार शिवसेनेतून फुटल्यानंतर तसेच शिंदे फडणवीस यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या होत्या.
पुणे : मी दुसऱ्या पक्षावर टीका करणार नाही. मात्र ते त्यांच्या फायद्यासाठी करत आहे, त्यांचा अजेंडा राबवत आहेत, अशी प्रतिक्रिया मनसे नेत्या शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी केली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. येथील एका साडीच्या दुकानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी खरेदीही केली. या कार्यक्रमप्रसंगी त्यांच्याशी टीव्ही 9ने संवाद साधला. राजकीय (Political) टीकाटिप्पणी करणार नसल्याचे सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, की मी इतर पक्षांवर टीका करणार नाही. सरकार काय करत आहे हे नाही, तर माझा मुलगा काय करत आहे, माझा नवरा काय करत आहे किंवा माझा पक्ष काय करत आहे, याच्यावर मी लक्ष ठेवून असते, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. शिवसेनेवर त्यांनी बोलण्यास नकार दिला. तर मंत्रिमंडळात (Cabinet) महिलांना स्थान असावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
महिलांना स्थान मिळणार, व्यक्त केला विश्वास
दहा दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असे ऐकले आहे. त्यावेळी नक्की महिलांना स्थान मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपाकडे चांगल्या महिला आहेत. पंकजा मुंडे आहेत, त्यांच्याकडे मंत्रीपद गेले तर चांगले आहे. त्यांनी मागच्यावेळी चांगले काम केले होते, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. तर महिला आणि बालविकास हे खाते महिलेकडे असेल तर अधिक चांगले होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?
‘नो कॉमेंट्स’
शिवनसेनेच्या सध्याच्या परिस्थितीवर विचारणा केली असता, त्यांनी नो कॉमेंट्स असे उत्तर दिले. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार शिवसेनेतून फुटल्यानंतर तसेच शिंदे फडणवीस यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी त्यांनी जे पत्र लिहिले होते, त्यात या नेत्यांचे कौतुकही केले होते. दरम्यान, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रभर दौरे करत आहे. शिवसंवाद यात्रा काढत आहेत, त्याबद्दल विचारले असता, हे चांगले आहे, शुभेच्छा त्यांना, असे त्या म्हणाल्या.