उदयनराजे खासदारकीचा राजीनामा देणार?; सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?
कालपासून एक 14 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ 2009चा आहे. गणेश शेटे यांनी कोरोना काळात मंदिरे बंद करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता.
पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याने कोश्यारींविरोधात खासदार उदयनराजे भोसले यांनी रणशिंग फुंकले आहे. आधी रायगडावर आत्मक्लेश आंदोलन केल्यानंतर आता कोश्यारींविरोधात उदयनराजे आझाद मैदानात मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचवेळी उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून केली जात आहे. त्यात आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या एका विधानाची भर पडली आहे.
उदयनराजे भोसले हे राजीनामा देतील का? असं सुषमा अंधारे यांना विचारलं असता उदयनराजे नक्कीच राजीनामा देतील असं मला वाटतंय, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. त्यामुळे उदनराजे राजीनामा देणार की नाही? या चर्चांना उधाण आलं आहे.
यावेळी त्यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही टीका केली. मानसिक संतुलन बिघडलेल्या लोकांबद्दल बोलू नये. सिल्व्हर ओकवर लोकांना घुसवणं योग्य आहे का? असा सवाल त्यांनी सदावर्ते यांना विचारला.
सुषमा अंधारे यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्यावर ईडी लावता येत नाही. म्हणून माझे जुने व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. मला कशात तरी अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, असं त्या म्हणाल्या.
कालपासून एक 14 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ 2009चा आहे. गणेश शेटे यांनी कोरोना काळात मंदिरे बंद करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. तेच या व्हिडीओवरून मला विरोध करत आहेत. हे लोक वारीत कधीच सहभागी झाले नव्हते, ते मला विरोध करत आहेत. आचार्य तुषार भोसले यांच्या कंपूतील हे लोक आहेत, असं त्यांनी सांगितलं.
भाजपचा एक सेल माझ्याविरोधात सक्रिय झाला आहे. मला डॅमेज करण्याचा हा प्रयत्न आहे. या मागे भाजपचा हात आहे, असा आरोप करतानाच माझ्यामुळे जर संतांच्या आणि वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागते, असं त्या जाहीरपणे म्हणाल्या.
चंद्रकांत पाटलांच्या विरोधात षडयंत्र होत आहे. तेही भाजपमधील मंडळी करत आहेत. तेच मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच माझे जुने व्हिडीओ करून मला बदनाम केलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला.