पुण्यात व्हायरल होणारी ‘ती’ ऑडिओ क्लिप नेमकी कुणाची? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
कसब्यात आज पुन्हा एक बॅनर लागलंय, तर चिंचवडमध्येही कलाटेंविरोधात लागलेल्या बॅनरची चर्चा आहे. त्यात 15 दिवस प्रचार करा आणि 7 हजार रुपये मिळवा, अशी एक फोनक्लिप सध्या पुण्यात चर्चेचा विषय बनलीय.
पुणे : कसबा (Kasba) आणि चिंचवड पोटनिवडणुकीत (Pimpri Chinchwad By-election) बॅनरबाजी सुरुच आहे. कसब्यात आज पुन्हा एक बॅनर लागलंय, तर चिंचवडमध्येही कलाटेंविरोधात लागलेल्या बॅनरची चर्चा आहे. त्यात 15 दिवस प्रचार करा आणि 7 हजार रुपये मिळवा, अशी एक फोनक्लिप सध्या पुण्यात चर्चेचा विषय बनलीय. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराआधीच बॅनर झळकू लागले आहेत. ब्राह्मण समाजाचा उमेदवार डावलला म्हणून याआधी कसब्यात एक बॅनर लागलं होतं, त्यानंतर आता हे दुसरं बॅनर पुण्यातल्या मोदी गणपती मंदिराजवळ लागलंय. याआधीच्या बॅनरप्रमाणेच हे बॅनरही निनावी आहे.
बॅनरमध्ये नेमकं काय म्हटलंय?
आमचेही ठरले धडा कसा शिकवायचा कसबा हा गाडगीळांचा….. कसबा हा बापटांचा…… कसबा हा टिळकांचा… का काढला आमच्याकडून कसबा? आम्ही दाबणार नोटा
पुण्यानंतर चिंचवडमध्येही अपक्ष राहुल कलाटेंच्या विरोधात बॅनर लागलंय.
चिंचवडमधील बॅनरमध्ये काय म्हटलंय?
एका अपक्षाची उमेदवारी खोक्यातून नागपूरची गुलामी, ठाण्याीच गद्दारी एकदम ओक्के डोक्यातून………डॅश- खरा शिवसैनिक
चिंचवडमध्ये मविआचे नाना काटे विरुद्ध भाजपच्या अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटेंमध्ये सामना होतोय. उमेदवारी जाहीर होण्याआधी राहुल कलाटे मविआचे उमेदवार असण्याची चर्चा होती. मात्र मविआनं नाना काटेंना तिकीट दिल्यामुळे राहुल कलाटेंनी अपक्ष अर्ज भरला.
राहुल कलाटे हे मूळ शिवसेनेचे आहेत. गेल्यावेळी शिवसेना-भाजप युतीत चिंचवडची जागा भाजपनं लढली तेव्हाही कलाटेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर राष्ट्रवादीनं त्यांना पाठिंबा दिला. यावेळी मविआ विरुद्ध भाजप लढत होत असतानाही राहुल कलाटे पुन्हा अपक्ष म्हणून लढतायत.
2019 मध्ये भाजपच्या लक्ष्मण जगतापांना 1 लाख 50 हजार 723 मतं मिळाली. त्याविरोधात राष्ट्रवादीच्या पाठिब्यानं अपक्ष लढलेल्या राहुल कलाटेंनी 1 लाख 12 हजार 225 मतं घेतली. या लढतीत भाजपच्या जगतापांचा 38 हजार 498 मतांनी विजय झाला होता.
काल ठाकरे गटानं कलाटेंना अर्ज माघारी घेण्याची विनंती ही केली. पण प्रयत्न अयशस्वी ठरला. म्हणून कलाटेंविरोधात बॅनरबाजी झाल्याचं बोललं जातंय. तर कारवाईचीही चर्चा होतेय.
चिंचवडची जागा ही आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी महत्वाची आहे. महापालिका हद्दीत एकूण ३ मतदारसंघ येतात. ज्यात चिंचवड विधानसभा, भोसरी विधानसभा आणि पिंपरी विधानसभेचा समावेश आहे.
यापैकी सध्या भोसरीमध्ये भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत. आणि पिंपरीत राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे म्हणून भाजप आणि राष्ट्रवादीनं चिंचवडमध्ये जागेसाठी जोर लावलाय.
इकडे कसब्यात बॅनरबरोबर एक व्हायरल ऑडिओ क्लिपही चर्चेत आलीय. एक महिला फोनवरुन लोकांना प्रचारासाठी ७ हजार रुपये देण्याचं आवाहन करतेय.
संबंधित महिला कोणत्या पक्षाची आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.मात्र तिनं सारसबाग भागातल्या कार्यालयात लोकांना यायला सांगितलं असल्यामुळे सारसबाग भागात कोणत्या पक्षाचं कार्यालय आहे, याची चर्चा पुण्यात होऊ लागलीय.
कसब्यात भाजपचे हेमंत रासने, मविआचे रवींद्र धंगेकर आणि हिंदू महासंघाचे आनंद दवेही मैदानात आहेत. कसब्यात ब्राह्मण हा समाज भाजपचा पारंपरिक मतदार राहिलाय. 1978 पासून इथं भाजपचं वर्चस्व आहे. पण समाजाची उमेदवारी डावलल्याचा आरोपात आनंद दवेंनी उमेदवारी भरलीय.
दोन्ही पोटनिवडणुकीत विजयचा दावा मविआनं केलाय. तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी निवडणुका हाती घेतल्यामुळे इथं विजय शिंदे-भाजप सरकारचाच होईल, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.