Women Reservation Bill : आरक्षण नसताना पहिल्याच लोकसभेत पुणे मतदार संघाने दिल्या महिला खासदार
Women Reservation Bill : गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. आता हे विधेयक राज्यसभेतही मंजूर होण्याचा मार्गावर आहे. त्यानंतर २०२६ नंतर महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण मिळणार आहे.
पुणे | 21 सप्टेंबर 2023 : लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. आता राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरु आहे. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यावर देशातील लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. गेली अनेक वर्ष प्रयत्न केल्यानंतर हे आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. परंतु आरक्षण नसताना पुणे जिल्ह्यातून सर्वात पहिल्या खासदार महिला झाल्या आहेत. १९५१ मध्येच पुण्यातून महिला खासदार निवडून गेल्या आहेत. यामुळे पुणे तेथे काय उणे असे परत म्हणावे लागले. कारण महिला खासदार निवडीचा पहिला पायंडा पुणे शहरानेच पाडला आहे.
कोण होत्या पहिल्या महिला खासदार
१९५२ मध्ये पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत पुण्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान इंदिरा मायदेव यांना मिळाला होता. त्या पुणे दक्षिणमधून (पुणे ग्रामीण) निवडून आल्या होत्या. त्यांना तब्बल 1 लाख 14 हजार 720 मते मिळाली होती. एस.एम.जोशी, ना.ग.गोरे यासारख्या दिग्गजांच्या समाजवादी पक्षाचे उमेदवार श्रीधर लिमये यांचा त्यांनी पराभव केला होता. त्यांना त्यावेळी तब्बल ६४ टक्के मते मिळाली होती. तो विक्रम महिला खासदारांमध्ये अजूनही कायम आहे.
न मागता मिळाली उमेदवारी
इंदिरा मायदेव काँग्रेसच्या सक्रिय सदस्य होत्या. कवियत्री म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांनी उमेदवारी मागितली नव्हती. परंतु सक्षम उमेदवार म्हणून काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. त्या लोकसभेत मौनी खासदार राहिल्या नाहीत. अभ्यास खासदार म्हणून त्याच्या कारकीर्दीची पहिली टर्म ओळखली गेली. पुढे त्या सक्रीय राजकारणातून बाजूला झाल्या. तसेच त्यांच्या परिवारातून कोणीही राजकारणात आले नाही.
बारामतीमधून सर्वाधिक महिला उमेदवार
बारमती मतदार संघातून सर्वाधिक महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली. डॉ.प्रतिभा लोखंडे, कांता नलावडे, कांचन कुल यांनी बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवली. परंतु त्यांना यश झाले नाही. सुप्रिया सुळे यांनी २००९, २०१४, २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली. त्या विजयी झाल्या. यामुळे पुण्यातून महिला उमेदवार निवडून येत असताना बारामतीमधून निवडणूक लढवण्याची कामगिरी महिलांनी केली.