पुणे : भारतीय कुस्ती संघाने महाराष्ट्र कुस्ती संघाला पत्र पाठवलं आहे. “बाळासाहेब लांडगे हे महाराष्ट्र कुस्तीगिरी संघाचे सचिव नाहीत. बाळासाहेब लांडगे यांचा कुस्तीगिरी संघ बरखास्त केला आहे. त्यामुळे बाळासाहेब लांडगेंनी भरवलेल्या स्पर्धेत सहभागी होऊ नका. अन्यथा भारतीय कुस्ती संघ कारवाई करणार”, असा इशारा देण्यात आला आहे. भारतीय कुस्ती संघाने पत्रक काढत याबाबतचा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अध्यक्ष असलेला कुस्तीगीर संघ काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र केसरी 2022 स्पर्धा नेमकी कोण भरवणार याबद्दल वाद समोर आला आहे.
या दरम्यान भारतीय कुस्ती संघाने एक पत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये बाळासाहेब लांडगे ज्या कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी होते तो संघ बरखास्त केला आहे. त्या संघाकडून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्यात येणार असल्याची माहिती आमच्यापर्यंत आली आहे. मात्र या स्पर्धेत कोणत्याही पैलवानाने सहभागी होऊ नये. अन्यथा त्यांच्याविरोधात भारतीय कुस्ती संघाच्या नियमांचं उल्लंघन केलं म्हणून कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा देण्यात आला आहे.
दुसरीकडे बाळासाहेब लांडगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. “कुस्तिगीर संघावर कारवाई करण्यात आली होती. पण भारतीय कुस्ती संघाला कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे पुढची स्पर्धा आम्हीच भरवणार आहोत. महाराष्ट्र कुस्तीगिरी संघाचा सचिव मीच आहे. त्यामुळे आमची कार्यकारी समितीची बैठकही झालेली आहे”, अशी भूमिका लांडगे यांनी मांडली आहे.
बाळासाहेब लांडगे यांनी या संदर्भात कोर्टात याचिका दाखल केली आहे. कोर्टाकडून अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. पण या निमित्ताने भारतीय कुस्ती संघ विरुद्ध महाराष्ट्र कुस्ती संघ असा वाद पाहायला मिळतोय.
दरम्यान, भारतीय कुस्ती संघाने थेट पत्र काढूनच महाराष्ट्र कुस्ती संघाला इशारा दिला आहे. संजय कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही महाराष्ट्रात समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील निर्णय ही समिती घेईल, असं भारतीय संघाने आपल्या पत्रात स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे पुढची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.