Rain | हिवाळ्यात राज्यात पावसाचा यलो अलर्ट, कोणत्या भागात अवकाळीचा अंदाज
unseasonal rain : राज्यात यंदा मॉन्सूनने सरासरी न गाठता निरोप घेतला. कमी मॉन्सून झाल्याचा फटका यंदा बसणार आहे. ऑक्टोंबर हिटनंतर नोव्हेंबर महिन्यातील गुलाबी थंडी सुरु झाली होती. मात्र दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. राज्यातील अनेक भागांत बुधवारी पाऊस झाला.
पुणे | 9 नोव्हेंबर 2023 : मॉन्सूनने निरोप घेऊन महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ऑक्टोंबर हिटचा तडाखाही राज्याने अनुभवला. त्यानंतर आता दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. वातावरण बदलाचा फटका देशातील अनेक भागाला आता बसला आहे. यामुळेच हवामान विभागाने नोव्हेंबर महिन्यात पावसाचा यलो अलर्ट गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी जारी केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता आयएमडीने व्यक्त केली होती. त्यानुसार राज्यात बुधवारीसुद्धा अनेक भागांत पाऊस झाला. आता गुरुवारी पाऊस होणार आहे. देशात कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीपमध्ये मध्यम पाऊस होणार आहे. तेलंगणा, अंदमान आणि निकोबार द्विप समूह, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
राज्यात कुठे दिला यलो अलर्ट
राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच येत्या २४ तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
8 नोव्हेंबर, IMD मॉडेल मार्गदर्शनानुसार दक्षिण #कोकण भागांसह दक्षिण #मध्यमहाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुढील 24 तासांत तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील २,३ दिवस या भागात अंशत: ढगाळ आकाश कायम राहील. pic.twitter.com/1ET7xoD4qG
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 8, 2023
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस
राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात बुधावारी पाऊस झाला. रायगडच्या अनेक भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अलिबाग, पेण तालुक्यात मुसळधार पावसामुळे भात पिकाचे नुकसान झाले आहे. सध्या भात पिकाची कापणी आणि मळणी सुरु आहे. त्याचवेळी मुसळधार पाऊस आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील इतर भागांत खरीप पिकांसाठी हा पाऊस नुकसानकारक आहे. द्राक्ष आणि कांद्याला या पावसाचा फटका बसणार आहे. परंतु रब्बी पिकाला पावसाचा फायदा होणार आहे.
शेतकरी संकटात
यंदा कमी पावसामुळे खरीप हंगाम चांगला आला नाही. यामुळे शेतकरी संकटात आला असताना पुन्हा अवकळी पाऊस सुरु झाला आहे. त्याचा फटका शेतात असलेल्या खरीप पिकाला बसणार आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतमाल घरात आणण्याची शेतकऱ्यांची घाई सुरु असताना अवकाळी पाऊस सुरु झाला आहे.