हे काय चाललंय? पुण्यात खडकवासला धरण परिसरात तरुण-तरुणींचा बेजबाबदारपणा
राज्यभरात मुसळधार पाऊस पडत असताना पुण्यात काही तरुण-तरुणींचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. त्यामुळे अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे नदी, धरणं आणि धबधब्याच्या पाण्यात वाहून जाण्याच्या घटना वाढलेल्या असताना काही तरुणांना अजूनही याबाबतचं गांभीर्य समजताना दिसत नाहीय.
पुणे | 27 जुलै 2023 : वाढदिवस साजरा करणं यात काहीच वावगं नाही. उलट वाढदिवस साजरा करायला हवा. आपल्या आयुष्यात प्रत्येक वर्षी हा एकमेव असा दिवस असतो ज्यादिवशी आपल्याला खूप आनंदी वाटतं. तसं आपण नेहमी आनंदातच राहतो. पण वाढदिवसाचा दिवस हा जास्त स्पेशल असतो. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवसाचं सेलिब्रेशन देखील तितक्याच स्पेशल पद्धतीने तरुणांकडून केलं जातं. पण हे सेलिब्रेशन करताना आपल्याला काही गोष्टीचं भान असलं पाहिजे हे मात्र निश्चितच. आपण काय करतोय, कुठे करतोय, त्याचा परिणाम काय होणार तसेच इतरांना तर त्रास होणार नाही ना? या गोष्टींचा विचार जरुर करायला हवा. पण हल्ली काही तरुणांकडून याचं काही तारतम्य बाळगलं जाताना दिसत नाहीत.
विशेष म्हणजे यामध्ये मुलींचा देखील समावेश आहे. त्यामुळे आपली वाटचाल नेमकी कुठल्या दिशेला चाललीय? असा प्रश्न उपस्थित होतो. हे सगळं सांगण्यामागील कारण म्हणजे पुण्यात काही तरुण-तरुणींकडून अतिशय बेजाबदारपणे वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांचा वाढदिवस सेलिब्रेशनचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण या विद्यार्थ्यांच्या या अशाप्रकारच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करत आहेत.
पुणे हे विद्येचं माहेरघर मानलं जातं. राज्यभरातील हजारो विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येतात. विद्यार्थी इथे चांगल्याप्रकारे शिक्षण घेतात आणि चांगल्या ठिकाणी नोकरी देखील करतात. पण काही विद्यार्थ्यांच्या वागणुकीमुळे विद्यार्थ्यांची प्रतिमा मलिन होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत अनेक वेगवेगळे उपक्रम राबवावेत. त्यांनी मौजमस्ती करावी, फिरायलाही जावं. हा त्यांचा अधिकार आहे. पण काहीजण बेजाबदारपणे वागतात. त्यामुळे त्यांचा जीवदेखील धोक्यात टाकतात. तसेच त्यांच्यासह इतरांचा देखील जीव धोक्यात टाकतात.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यात तरुणाईची हुल्लडबाजीचा प्रकार समोर आला आहे. खडकवासला धरणाच्या दरवाजा समोरच तरुण-तरुणींनी विचित्र पद्धतीने वाढदिवस साजरा केला. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असताना दुसरीकडे जीव धोक्यात घालत तरुण-तरुणींनी वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. तरुण-तरुणींच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओदेखील व्हायरल झालाय.
राज्यभरात सध्या मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईसह पुणे जिल्ह्यालादेखील हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय. मुंबईत तर मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सेवेवर मोठा परिणाम पडलाय. असं असताना काही तरुणांना याचं भान राहिलेलं आहे का? असा प्रश्न आहे. प्रशासनाकडून वारंवार गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला जातोय. पण काही जणांकडून त्यावर कानाडोळा केला जातोय.