Latur : कचरा व्यवस्थापनासाठी क्यूआर कोड, स्वच्छतेमध्ये मानांकन मिळालेल्या लातूरात चालंलय काय?
महिन्याभरापूर्वीच लातूर शहराला स्वच्छतेच्याबाबतीत राष्ट्रपचतींच्या हस्ते मानांकन मिळालेले आहे. त्यानंतर तर स्वच्छतेसाठी वेगवेगळे पर्याय मनपाने समोर आणले आहेत. पण सध्या सुरु असलेल्या क्यूआर कोडची गोष्टच न्यारी आहे. म्हणे कचरा व्यवस्थापनासाठी क्यूआर कोडचा वापर केला जाणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या या अजब युक्तीमुळे विरोधकही चक्रावून गेले आहेत.
लातूर : महिन्याभरापूर्वीच लातूर शहराला स्वच्छतेच्याबाबतीत राष्ट्रपचतींच्या हस्ते मानांकन मिळालेले आहे. त्यानंतर तर स्वच्छतेसाठी वेगवेगळे पर्याय मनपाने समोर आणले आहेत. पण सध्या सुरु असलेल्या क्यूआर कोडची गोष्टच न्यारी आहे. म्हणे कचरा व्यवस्थापनासाठी क्यूआर कोडचा वापर केला जाणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या या अजब युक्तीमुळे विरोधकही चक्रावून गेले आहेत. नेमके या पध्दतीमुळे कचऱ्याचे व्यवस्थापन कसे केले जाणार आहे असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे आता मनपा प्रशासनावर टिकाही सुरु झाली आहे.
नेमका क्यूआर कोड कशासाठी?
मनपाने शहरातील काही भागात आणि 14 नंबर प्रभागामध्ये सुका कचरा गोळा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या दिलेल्या आहेत. या बॅगवर आणि नागरिकांच्या घरावर क्यूआर कोड लावून प्रत्येकाच्या घरात होणारा सुका कचरा, त्याचे प्रमाण आणि विश्लेषण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इथपर्यंत ठीक आहे पण बॅगवर आणि घरावरही क्यू्आर कोड लावला जात असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे संबंधिताचे नाव, मोबाईल नंबर याची माहितीही मनपाकडे जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक यावर आक्षेप घेत आहेत. तर दुसरीकडे कचऱ्याचे वर्गीकरण व्हावे म्हणून ही पध्दत अवलंबली जात असल्याचे मनपा कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे.
यामध्ये दुरुस्ती केली जाईल..
कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी दररोज ठरवून दिलेल्या प्रभागात जाते की नाही हा खऱा प्रश्न आहे. या क्यूआर कोडमुळे हेच लक्षात येणार असल्यामुळे लावण्यात आले आहेत. मात्र, यावरुन जर नागरिकांना त्रास होणार असेल तर यामध्ये दुरुस्ती केली जाणार असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले आहे. तर विरोधकांकडूनही या अजब प्रकारावरुन टिका होऊ लागली आहे. त्यामुळे अशाच पध्दतीने कचऱ्याचे संकलन होणार का यामध्ये बदल केला जाणार हे पहावे लागणार आहे.
उद्देश चांगला पण अनाठायी महत्व…
ओला आणि सुका कचरा हा वेगवेगळाच साठवला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लातूरकर असेच करीत आहेत. या माध्यमातूनही कचऱ्याचे वेगळीकरण होणार असेल तर काहीच समस्या नाही पण कचरा गोळा करीत असताना एका-एका कुटूंबाच्या कचऱ्याचे विश्लेषण होणार यालाच लातूरकरांचा देखील विरोध होत आहे.