इतर राज्यांत 100 टक्के लसीकरण होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही?; भारती पवार यांचा सवाल
इतर राज्यांमध्ये जर 100 टक्के लसीकरण होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात आजपासून 15 ते 18 या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. महाराष्ट्रात अचानक केसेस वाढत आहेत, अशा परिस्थितीत धडाडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. केंद्रीय पथकांनी आढावा घेऊन सूचना केल्या आहेत. इतर राज्यांमध्ये जर 100 टक्के लसीकरण होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उपस्थित केला आहे. केंद्राने सगळ्या राज्यांना लस उपलब्ध करून दिली आहे, राज्यात दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचा आकडा कमी आहे, तो वाढवण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया भारती पवार यांनी दिली आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ
सध्या मुंबईत प्रचंड रुग्णसंख्या वाढते आहे, आताच काळजी घेतली नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते. पुढचा धोका ओळखून केंद्राने महाराष्ट्रालाही निधी दिला आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप या निधीच्या माध्यमातून पुढे काम झालेलं नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. निधी उपलब्ध असेल तर तो खर्च केला पाहिजे, त्यासाठी आमच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले. केंद्राने ECCRP 1 आणि ECRP 2 च्या माध्यमातून 23 हजार कोटींची मदत दिली आहे, असा दावाही भारती पवार यांनी केला आहे.
रुग्ण वाढल्यास केंद्राचा प्लॅन काय?
येत्या काळात प्रत्येक राज्याला पेशंट वाढले तर काय करायचं? या संदर्भातील पत्रं केंद्राने दिले आहेत. ओमिक्रॉनचा प्रसार वाढल्याने राज्यांनी अलर्ट राहवे, काही राज्यात 100 टक्के लसीकरण झाले आहे, तिथे कमी केसेस आहेत, असेही भारती पवार म्हणाल्या आहेत. तसेच मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्या बद्दल त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत.