विखे-शिंदेंची एकमेकांवर स्तुतीसुमने, तर बाळासाहेब थोरातांना टोमणे, पाहा काय-काय म्हणाले?
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकमेकांचे कौतुक केले, पण एकमेकांच्या प्रशंसेमधून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना टोमणे लगावले. त्यांच्या टीकेवर आता बाळासाहेब थोरात यांच्याकडून काही प्रत्युत्तर देण्यात येते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. एकमेकांची स्तुती करताना दोघांनीही नाव न घेता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मात्र टोमणे लगावले आहेत. नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी जिल्ह्यातील महायुतीचे आमदार, मंत्री विखे पाटील आणि विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी भाषणादरम्यान एकेकाळी भाजपमधील प्रतिस्पर्थी असलेले विखे आणि शिंदे यांनी एकमेकांचे तोंडभरून कौतुक केले. “विधानसभा निवडणुकीच्या वेळी काही लोकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लावले होते. नेवासा तालुक्यातील देखील काहींनी भावी मंत्री म्हणून बोर्ड लावले होते. जनतेने या सर्वांची स्वप्न धुळीस मिळवली”, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला.
“आपल्या जिल्ह्यातील नेते राम शिंदे हे आपल्या सुदैवाने विधानपरिषदेचे सभापती झालेत. त्यांच्यामुळे जिल्ह्याचा बहुमान वाढला. आम्ही मंत्री असलो तरी मंत्र्यांना आदेश देण्याचा अधिकार सभापतींना. मंत्र्यांना आदेश देण्याचे भाग्य आपल्या जिल्ह्याला मिळाले. आपल्या सर्वांना राम शिंदेंचे कौतुक आहे. जिल्ह्यात विकासाची कामे करताना त्यांची मोठी मदत होणार आहे”, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी राम शिंदे यांची स्तुती केली.
राम शिंदे काय म्हणाले?
“थोरात म्हणजे मोठे प्रस्थ. त्यांच्यासमोर उमेदवार फक्त नावापुरते उभे राहायचे. मात्र तिथे मोठी क्रांती झाली. मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणाऱ्याला अमोल खताळ यांनी विखे पाटलांच्या आशिर्वादाने घरी पाठवले”, असा टोला राम शिंदे यांनी थोरातांना लगावला. यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचं तोंडभरुन कौतुक केलं.
“विखे पाटील म्हणजे चिरकाल नेतृत्व. त्यांची आता आठवी टर्म. ते पुढच्या वेळी आपल्या सर्वांना आठवून आठवून नवव्या वेळी निवडून येणारच. पुढच्या वेळी ते विधानसभेतील सर्वात जेष्ठ आमदार असणार आहेत. कालिदास कोळंबकर पुन्हा उभे राहणार नाहीत, असे ते मला म्हणाले आहेत. विखे पाटलांनी सांगितलं की माझ्याकडे आदेश देण्याचे काम. सभापती म्हणून मी नवीन. नगरहून निघालो तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला. त्यांनी माझी तारीख मागितली. लोकायुक्त नेमणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन माझ्या दालनात होणार आहे. हा प्रोटोकॉल तर मोठा आहे. जबाबदारी मोठी असली तरी टाकलेली जबाबदारी पार पाडणे माझ्या रक्तात आहे. दिलेलं पद आणि जागा यावर स्वतःला सिद्ध करावे लागेल”, असंही राम शिंदे यावेळी म्हणाले.