हाती मशाल, लाखोंचा जनसमुदाय, राहुल गांधी नांदेडमध्ये दाखल, भारत जोडोचा पुढचा अंक आता महाराष्ट्रात
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज अखेर महाराष्ट्रात दाखल झालीय.
नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज अखेर महाराष्ट्रात दाखल झालीय. राहुल गांधी यांच्या या यात्रेचं अतिशय जलल्लोषात स्वागत करण्यात येतंय. ही यात्रा तेलंगणाहून महाराष्ट्राच्या दिशेला निघाली होती. अखेर तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर ही यात्रा दाखल झाली आणि नंतर नांदेडच्या देगलूर इथे पोहोचली. यावेळी वातावरण अतिशय वेगळंच होतं. या यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांच्या हातात मशाल होती. खरंतर भारतात येताना मशाल घेऊन प्रवेश करायचा यासाठीच या मशाल यात्रेचं काँग्रेसकडून आयोजन करण्यात आलं होतं. रात्रीच्या अंधारात अतिशय रोमहर्षक वाटावं अशा वातावरणात ही मशाल यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली.
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींचं स्वागत केलं. देगलूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ही रॅली पुढच्या दिशेचा प्रवास करेल.
तेलंगणातील मेन्नूर या ठिकाणी आज राहुल गांधींची सभा झाली होती. त्यानंतर या यात्रेने महाराष्ट्राच्या दिशेला निघाली होती. अखेर आज रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ही भारत जोडो यात्रा कन्याकुमारी येथून सुरु झाली होती. ही यात्रा दक्षिण भारतातील सर्व राज्यांना भेट देत आता महाराष्ट्रात दाखल झालीय.
ही यात्रा महाराष्ट्रात 344 किमी चालणार आहे. ही पदयात्रा आहे. त्यामुळे ही यात्रा पुढचे 15 दिवस महाराष्ट्रात राहणार आहे. महाराष्ट्रातील नांदेड, वाशिम, अकोला, हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे.
या दरम्यान राहुल गांधी महाराष्ट्रात एकूण 14 ठिकाणी थांबणार आहेत. ही यात्रा 15 विधानसभा आणि 6 लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे.
महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधून 382 किमी प्रवास केल्यानंतर महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात ही यात्रा प्रवेश करेल. एकूण 3570 किमीची ही भारत जोडो यात्रा आहे. त्यापैकी 2355 किमीची यात्रा अजून बाकी आहे.