‘काहीही होऊ द्या, ही यात्रा श्रीनगरला जाऊनच थांबेल’, महाराष्ट्रात दाखल होताच राहुल गांधी कडाडले
राहुल गांधी यांनी नांदेडच्या देगलूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करुन महाष्ट्रात भारत जोडो यात्रेला शुभारंभ केला. यावेळी त्यांनी पाच मिनिटांचं भाषण केलं.
नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दक्षिण भारतातून गेल्या दोन महिन्यांपासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल झाली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने महाराष्ट्रात हाती मशाल घेऊन आगमन केलं. यावेळी राज्यातील सर्व काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींचे मनापासून स्वागत केले. राहुल गांधी यांनी नांदेडच्या देगलूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करुन महाष्ट्रात भारत जोडो यात्रेला शुभारंभ केला. यावेळी त्यांनी पाच मिनिटांचं भाषण केलं. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच आपल्या यात्रेची रुपरेषा सांगितली.
“ही यात्रा आम्ही दोन महिन्यांपूर्वी कन्याकुमारी येथून सुरु केली होती. आता ही यात्रा जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथे जाऊन थांबेल. त्याच्याआधी या यात्रेला कोणीही रोखू शकत नाही”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
राहुल गांधी नेमंक काय म्हणाले? वाचा त्यांचं संपूर्ण भाषण
“छत्रपती शिवाजी महाराज की जय! रात्रीच्या दहा वाजता तुम्ही आमचं स्वागत केलं. या स्वागतासाठी तुमच्या सगळ्यांना खूप धन्यवाद! तेलंगणाहून आमच्यासोबत आलेले नेते आणि मागे असणारी गर्दी यांचेही आभार मानतो. ही यात्रा आम्ही दोन महिन्यांपूर्वी कन्याकुमारी येथून सुरु केली होती. आता ही यात्रा जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथे जाऊन थांबेल. त्याच्याआधी या यात्रेला कोणीही रोखू शकत नाही. काही होऊ दे, ऊन, वारा, पाऊस, वादळ येऊ दे, ही यात्रा चालत जाऊन श्रीनगरला जाईल आणि तिथे तिरंगा फडकावणार.”
“या यात्रेचं लक्ष्य भारताला जोडण्याचं आहे. हिंदुस्थानात आज रोष, द्वेष आणि हिंसा पसरवली जात आहे. त्याविरोधात आपल्याला आवाज उठवायचा आहे. यात्रेत जो आमच्याशी बात करु इच्छित असेल, मग तो शेतकरी, छोटा व्यापारी, मजूर, जो कुणी आहे, त्यासाठी आमचे दरवाजे आणि आमचं मन खुलं आहे. आमचं लक्ष्य हिंदुस्थान आणि पुढचे पंधरा दिवस महाराष्ट्राचं दु:ख ऐकण्याचं आहे.”
“देशात बेरोजगारी वाढत आहे. पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे छोटे व्यापारी, शेतकऱ्याचं नुकसान होतंय. तरुणांना रोजगार मिळत नाहीय. गॅस सिलेंडर 400 रुपयांचा झाला म्हणून पंतप्रधान मोदी ओरडायचे. पण आता मोदी गॅस सिलेंडरची तक्रार करत नाहीत. पेट्रोलच्या भावावर ते बोलत नाहीत. देशातील फक्त दोन टक्के नागरिकांना सरकार फायदा पोहोचवत आहे.”
“या मुद्द्यांवर आम्ही उभे आहोत. आम्ही चालत आहोत आणि दिवसभर चालतो आणि तुमचं म्हणणं ऐकतो. दिवसभर सहा-सात तास ऐकल्यानंतर संध्याकाळी पंधरा-वीस मिनिटे आमचं म्हणणं मांडतो. मला आज आनंद आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभा राहून सुरुवात करतोय. महाराज आपला इतिहास आहे. सर्वांचा खूप आभारी आहे. जय हिंद!”