कोण आहेत राहुल कनाल, ज्यांच्या घरी आयकर विभागानं धाड टाकलीय? आदित्य ठाकरेंशी कनेक्शन?
आयकर विभागाच्या पथकाने आज सकाळी राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला. आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरी आले आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली आहे.
मुंबईः मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उभ्या महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध भाजप असे रण पेटलेले दिसत आहे. त्यात एकमेकांवरचे आरोप, कोणत्या पक्षाकडून कोण आत जाणार याचे दावे आणि प्रतिदावे सुरू आहेत. त्यातच शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या (shivsena) आणखी एका नेत्याच्या घरी छापेमारी सुरू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल (rahul kanal) यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे. कोण आहेत हे राहुल कनाल. त्यांच्याबद्दल थोडे जाणून घेऊयात.
कोण आहेत कनाल?
राहुल कनाल हे उद्योजक आहेत. ते युवा सेनेचे सक्रिय पदाधिकारी आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. या शिवाय शिर्डी देवस्थान समितीवर ते पदाधिकारीही आहेत. कनाल मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य आहेत. ते शिक्षण समितीवरही होते. अनेक जण कनाल यांचे इम्तियाज खत्रीशी कनेक्शन असल्याचे सांगतात. तर काहीजण कनाल हे आदित्य ठाकरेंसाठी पार्ट्यांचे आयोजन करतात, असे म्हणतात.
दिग्गज अभिनेत्यांसोबत संबंध
इम्तियाज खत्रीप्रमाणे कनाल हे काही दिवसांपासून बेपत्ता आहेत, अशी चर्चा होती. कनाल यांची अनेक मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत उठबस आहे. त्यांचे सलमान खान, संजय दत्तपासून अनेक अभिनेत्यांपर्यंत फोटो आपल्याला दिसतील. त्यांची पोहच वरपर्यंत असल्याची चर्चा आहे. ते ट्वीटरवर चांगलेच अॅक्टीव असतात. सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी त्यांनी जस्टीस फॉर रिया, केलेले ट्वीट मध्यंतरी व्हायरल झाले होते.
छाप्यानंतर चर्चेत
आयकर विभागाच्या पथकाने आज सकाळी राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला. आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरी आले आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली आहे. यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. राहुल कनाल हे घरी आहेत की नाही, याची माहिती मिळू शकली नाही. तसेच हे धाडसत्र किती दिवस चालेल याचीही काही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या छाप्यानंतर पुन्हा ते चर्चेत आलेत.
इतर बातम्याः
मालेगाव महापालिकेचे प्रताप; पोलीस मैदानाच्या सरकारी जागेची इदगाह ट्रस्टला खिरापत