Raigad Flood : महाड आणि पोलादपूर तालुक्यात पंचनामे, मृतांच्या नातेवाईकांना मदत सुरु – जिल्हाधिकारी
प्रशासनाकडून महाड आणि पोलादपूर तालुक्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. तशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलीय.
रायगड : राज्यात पावसाने हाहा:कार घातल्यानंतर रायगड जिल्ह्यात महाड आणि पोलादपूर तालुक्यात त्याचा सर्वात मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. महाडमध्ये महापुरासह तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या दुर्घटनेत 80 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झालाय. त्यातील 53 मृतदेह हाती लागले. मात्र, अन्य मृतदेह चिखल-मातीच्या ढिगाऱ्याखालून न काढता मदतकार्य थांबवण्यात आलं. आता प्रशासनाकडून महाड आणि पोलादपूर तालुक्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. तशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलीय. (Panchanamas into damages in Mahad and Poladpur talukas started)
महाड आणि पोलादपूरमध्ये 22 जुलै रोजी आलेला महापूर आणि भूस्खलनात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी जिल्ह्यातील अन्य तालुक्यातून तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी यांची टीम आणण्यात आले आहे. महाड शहर, तालुक्यातील 13 गावं, पोलादपूर तालुक्यात 6 गावं, पोलादपुर शहर प्रभावित झालं आहे. महाडमध्ये 14 हजार 368 कुटुंब बाधित झाली आहेत. त्यापैकी 8 हजार 151 पचंनामे पूर्ण करण्यात आले आहेत. तर पोलादपुर मध्ये 751 कुटुंबं बाधित झाले आहे. त्यापैकी 560 कुटुंबाचे पचंनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरीत कुटुंबाचे पचंनामे पुढील 2 दिवसात पुर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आल्याची माहिती निधी चौधरी यांनी दिली.
SDRF च्या निकषानुसार मदत
पोलादपूर तालुक्यातील साखरवाडी आणि केवनाळे येथील 11 मयतांच्या कुटुंबियांना SDRF कडून 4 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. तर महाडच्या तळीये गावात 53 जणांचे मृतदेह मिळाले. तर 31 बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्यात आलं आहे. त्यापैकी 31 मृतांच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान SDRF च्या निकषाप्रमाणे देण्यात आलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पतंप्रधान सहाय्यता निधीचे 1 लाख आणि 2 लाख रुपये प्राप्त होताच देण्यात येणार आहेत. तळीये दुर्घटनेतील 22 मृतांच्या नातेवाईकांचे बँक डिटेल्स अद्याप येणे बाकी आहे. ते आल्यानंतर त्यांनाही मदत देण्यात येईल, अशी माहीती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.
इतर बातम्या :
तळीये दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जागा ठरली, नातेवाईकांना तातडीने 2-2 लाखाची मदत
ठाकरे सरकारच्या पूरस्थिती हाताळण्याचं मूल्यमापन आता करणार नाही, पण…; फडणवीसांनी दिला इशारा
Panchanamas into damages in Mahad and Poladpur talukas started