वाघा श्वानच्या अस्तित्वावर अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज काय म्हणाले? संभाजी ब्रिगेडबाबत…
Bhushansingh Raje Holkar Big Statement : मी घराण्याचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय कुठल्याही राजकीय पक्ष्याचा प्रतिनिधी म्हणून नाही. आमच्या घराण्याने निधी दिला आहे. त्याचे क्रेडीट दिले पाहिजे. चुकीचा प्रकार घडला तर संभाजीराजेंना आमचा विरोध असेल. संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांना आळा घालावा.

मागच्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात लोकांच्या प्रश्नांपेक्षा ऐतिहासिक मुद्द्यांवर भर देण्याचे काम सुरू आहे. यामुळे समाज एकमेकांच्या विरोधात उभा राहत आहे. वाघ्या कुत्र्याचा अस्तित्व होते, की नव्हते यावर मी काही बोलणार नाही. परंतु या प्रकरणाच्या चौकशी करावी. त्यासाठी संजय सोनवणी आणि इंद्रजित सावंत यांच्यासारख्या इतिहास अभ्यासकांना घेवून समिती नेमावी. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या विरोधात आणि समर्थनात असणाऱ्या इतिहास संशोधकांची समिती नेमावी, अशी मागणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी गुरुवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
वाघ्याची अडचण आहे की…
भूषणसिंह राजे होळकर यांनी वाघ्या श्वानाच्या अस्तित्वावर भाष्य करण्यास स्पष्टपणे नकार दिला. ते म्हणाले, औरंगजेबाच्या समाधीचा विषय झाला. आता रायगड येथील वाघ्या कुत्र्याचा विषय समोर आणला गेला आहे. रायगड येथे असलेली वाघ्या कुत्र्याच्या विषय हा कोणत्या एका जातीचा किंवा समाज्याचा नाही. वाघ्या श्वानाच्या इतिहास अभ्यासक बोलतील. याबाबत संभाजी राजेंनी भूमिका घेतली. मात्र वाघ्याची अडचण आहे की, होळकरांनी निधी दिलाय याची अडचण आहे? हे समजत नाही.
रायगडावरील वाघ्या श्वान हा विषय एका समाजाचा नाही. मात्र, महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय रंग दिला जात आहे. होळकरांनी स्वतःच्या कुत्र्याची समाधी रायगडावर का बांधली असती. या सगळ्या गोष्टी कथा आहेत. वाघ्याची अडचण आहे की तुकोजी महाराज होळकर यांनी निधी दिला याची अडचण आहे, हे समजत नाही, असे भूषणसिंह राजे होळकर यांनी यांनी म्हटले.




इंग्रजांबरोबर कधी होळकरांनी सेटलमेंट केलेले नाही…
काल एका पत्रकार परिषदेत म्हटले गेले होळकर इंग्रजांना घाबरत होते. मात्र, इंग्रजांबरोबर कधी होळकरांनी सेटलमेंट केलेले नाही. होळकरांनी सर्व समाजासाठी काम केले. होळकर शेवटपर्यंत इंग्रजांसोबत लढले. होळकर कधीही इंग्रजांसमोर झुकले नाहीत. होळकर इंग्रजांना घाबरत होते, हे वक्तव्य करणाऱ्यांना इतिहासाची माहिती नाही. चुकीचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा भूषणसिंह राजे होळकर यांनी संभाजी ब्रिगेडला दिला. तुकोजी होळकर यांनी शिवस्मारकासाठी निधी दिला होता. त्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. त्यामुळे, वाघ्या कुत्र्याचा प्रश्न निर्माण झाला आहे की, होळकरांनी दिलेल्या निधीवरच वाद घातला जात आहे?
भूषणसिंह राजे होळकर म्हणाले, मी घराण्याचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय कुठल्याही राजकीय पक्ष्याचा प्रतिनिधी म्हणून नाही. आमच्या घराण्याने निधी दिला आहे. त्याचे क्रेडीट दिले पाहिजे. चुकीचा प्रकार घडला तर संभाजीराजेंना आमचा विरोध असेल. संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांना आळा घालावा. होळकरांची बदनामी कोणीही करू नये. अहिल्यादेवींच्या जयंतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका. मी मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रश्न मांडणार आहे. 31 मेला अहिल्याबाई होळकर यांची 300 जयंती आहे. यावेळी कोणतेही गालबोट लागू नये, याची काळजी घ्यावी. अहिल्यादेवी जयंतीला कार्यक्रम करून राजकीय स्टंट नको, असे त्यांनी म्हटले.