‘जय भवानी, जय शिवाजी बोलायचं आणि मत मिळवायचे दिवस गेले’, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचे झणझणीत अंजन, वक्तव्याने राज्यात एकच खळबळ
Udhav Thackeray Shivsena Raigad Karjat Statement : शिवसेना पक्ष फुटीनंतर राज्यातील राजकारणात मोठे बदल झाले. त्यापूर्वी शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाल्यानंतर राजकारणाचा परीघ बदलला होता. आता उद्धव ठाकरे गट मोठ्या बदलाची नांदी आणत असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री पदावरून बिनसल्यानंतर एका पंचवार्षिक पूर्वी शिवसेना आणि भाजपाचे फाटले. शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात यशस्वी केला. त्याला भाजपाने सुरूंग लावला नि राज्यात महायुतीचा अंक सुरू झाला. राज्यातील राजकारणाला या पाच वर्षात अनेक महाभूकंप बसले. शिवसेना, राष्ट्रवादीत उभी फूट पडली. पक्षीय भूमिका बदलत गेली तसा राजकारणाचा परीघ बदलला. आता उद्धव ठाकरे गट मोठ्या बदलाची नांदी तर आणत नाही ना, याची प्रचिती त्यांच्या नेत्याच्या वक्तव्यावरून जाणवत आहे.
आता जुना काळ गेला
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना बदलत्या काळाची जाणीव करून दिली. सध्या कोकण आणि तळकोकणात उद्धव ठाकरे गटातील अस्वस्थता समोर येत आहे. नेते भास्कर जाधव यांनी सुद्धा एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना फटकारले होते. त्यानंतर आता अंबादास दानवे यांनी बदलते राजकारण आणि राजकीय परीभाषा बदलल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिले. आता जुना काळ गेला असे सूचक वक्तव्य त्यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील संवाद मेळाव्यात शिवसैनिकांना दिला.




जय भवानी,जय शिवाजी आणि मते
जुना काळ गेला आता ‘जय भवानी जय शिवाजी बोलायचं आणि मत मिळवायची दिवस गेले.’ असा अजब सल्ला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी कर्जत येथे संवाद मेळाव्यात शिवसैनिकांना दिला. त्यांच्या या वक्तव्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पण सध्या राजकारणात मोठे उलटफेर झाले आहे. मित्रपक्ष आणि विरोधकांशी दोन हात करताना जनतेशी नाळ तुटता कामा नये, विकासाच्या राजकारणावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे भावनिक मुद्दांवर आता मतांचा जोगावा मागता येणार नाही, हे तर दानवे यांना सुचवायचे नसेल ना?
कार्यकर्त्यांशी साधला संवाद
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे ठाकरेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला.विधानसभेच्या निवडणुकीत पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण व्हावे या साठी या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल होत.या संवाद मेळाव्यासाठी विधापरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र
यावेळी मार्गदर्शन करताना अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना अनेक कानमंत्र दिले. पण बोलण्याच्या ओघात शिवसेनेची खरी ओळख असणारे घोषवाक्य म्हणजे ‘ जय शिवाजी, जय भावानी ‘ याबाबत अजब वक्तव्य करत राजकारणाची बदललेली परिभाषा व्यक्त केली. आता जय शिवाजी जय भवानी बोलून मते घ्यायचे दिवस गेले असे म्हणत उपस्थितांना कानमंत्र दिला. यावरून ठाकरेंची शिवसेना आता बदलली आहे हे कुठे तरी अधोरेखित होताना दिसत असून शिवसेनेची जुनी ओळख पुसून काही तरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न होतोय का? असा प्रश्न निर्माण होत आहे.