Monsoon Update : मान्सून विदर्भात दाखल, मुंबई, पुणे शहरात पावसाला सुरुवात, काय आहे आयएमडीचा अंदाज
Monsoon and Rain in Maharashtra : राज्यातील शेतकरी मान्सूनचा प्रतिक्षेत होता. आता मान्सून सक्रीय झाला आहे. विदर्भात मान्सून दाखल झाला आहे. मुंबई अन् पुणे शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. आगामी तीन दिवसांत कसा असणार पाऊस? याचा अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे.
नागूपर, मुंबई, पुणे : गेल्या पंधरा दिवसांपासून वाट पाहण्यास भाग पाडणारा मान्सून अखेर राज्यात दाखल झाला आहे. राज्यात सक्रीय झालेला मान्सून विदर्भात दाखल झाला आहे. दरवर्षी राज्यात ७ जून रोजी दाखल होणारा मान्सून यंदा कोकणात ११ जून रोजी आला होता. त्यानंतर १५ जूनपर्यंत राज्यात पसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. परंतु बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनचा प्रवास थांबवला. त्यामुळे १५ जून नंतर वेट अँड वॉच करावे लागले. अखेर २३ जूनपासून राज्यात मान्सून सक्रीय होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला.
विदर्भात मान्सून दाखल
विदर्भात मान्सूनचे आगमन झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा मान्सूनने व्यापला आहे. पुढील ६० तासांत संपूर्ण विदर्भात मान्सून पोहचणार आहे. २५ ते २८ जून विदर्भाच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सून वाटचाल जोरात सुरु झाली आहे. काल पडलेल्या पावसामुळे नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे. परंतु जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
दादरमध्ये रिमझीम पावसाला सुरुवात
उष्णतेमुळं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. कारण मुंबईत अखेर पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री मुंबईच्या विविध भागात चांगला पाऊस झाला. तसेच ठाणे, नवी मुंबईच्या परिसरात देखील पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईत गेले काही दिवस ढगाळ वातावरण आहे. मात्र, आजपासून मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात मान्सून सक्रिय झाला आहे. २४ जूनपासून पावसाचा जोर टप्प्याटप्प्याने वाढणार आहे. आता मान्सून पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. शनिवारी दादर परिसरात रिमझीम पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे शहरात पावसाला सुरुवात
पुण्यात विविध भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. कात्रज, कोंढवा, धायरी फाटा, वारजे, शिवणे, हिंगणे, सिंहगड रोड, नांदेड सिटी पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने पुण्यात शनिवारी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. ८ च्या सुमारास काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झालाय.