हे वागणं बरं नव्हं : उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, मुंबई, कोकणात पावसाचा अंदाज; विचित्र वातावरणामुळे गारठा वाढणार
सध्या तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मुंबई, पालघर, नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
नाशिकः उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार असून पुढचे दोन दिवस गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे नाशिकचा पारा 12.9 पर्यंत खाली घसरल्याची नोंद नाशिकच्या हवामान केंद्रात झाली आहे. त्यातच सध्या तयार झालेल्या विचित्र वातावरणामुळे हा गारठा आणखी जास्त वाढू शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केला.
तीव्र कमी दाबाचा पट्टा
श्रीनिवास औंधकर म्हणाले की, सध्या उत्तर महाराष्ट्राच्या पट्ट्यात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मुंबई, पालघर, नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या ध्रुवीय वाऱ्याची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे तापमानात गारठाही वाढणार आहे. बोचरी थंडी आणि पाऊस असे विचित्र वातावरण या काळात राहणार आहे. येत्या 3 डिसेंबर रोजी बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होत आहे. हे वादळ कोलकात्याकडे जाईल. त्यामुळे आपल्या इकडलेही वातावरण निवळेल आणि पुन्हा थंडी वाढेल, असा अंदाज औंधकर यांनी वर्तवला.
थंडीचे उशिरा आगमन
नाशिकमध्ये दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीचे आगमन होते. मात्र, सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या पावासाने नाशिकरांच्या नाकी नऊ आणले. त्यात गोदावरीला नदीला आलेले चार पूर. मनमाड, नांदगावमध्ये झालेली भीषण अतिवृष्टी. अगदी दिवाळीतही नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावली. आता अजूनही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या साऱ्या हवामान बदलामुळे यंदा डिसेंबर सुरू होण्यापूर्वी थंडीचे आगमन झाले आहे. येणाऱ्या काळात पावसाचे वातावरण निवळल्यानंतर थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे.
सध्या तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मुंबई, पालघर, नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या ध्रुवीय वाऱ्याची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे तापमानात गारठाही वाढण्याची शक्यता आहे. – श्रीनिवास औंधकर, संचालक, एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, एमजीएम, औरंगाबाद
इतर बातम्याः
नाशिककरांना 2 तासांत गाठता येणार सुरत, ग्रीनफील्ड महामार्गाने जिल्ह्याचे रूपडे बदलणार!